हडपसर येथील केंद्रीय नागरी विमान विभागाच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये शनिवारी दुपारी चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीच्या शरीराचे अवयव एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आढळून आले. व्यक्तीचा खून करून त्याचे अवयव टाकले असण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांना अद्याप मृत व्यक्तीचे डोके आणि शरीर मिळालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरमधील एका चेंबरमधून वास येत असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी चारच्या सुमारास नागरिकांनी केला. हडपसर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना ग्लायडिंस सेंटरच्या हेलीपॅड स्टोर रुमच्या बाजूस असलेल्या गटारात निळ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी आढळून आली. त्यात पुरूष जातीच्या एका अज्ञात व्यक्तीचे दोन हात, दंडाचा एक भाग, दोन पाय मिळून आले. हे सर्व अवयव सडलेल्या स्थितीत होते. पोलिसांना या व्यक्तीचे डोके व धड मिळालेले नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.