लोणावळाजवळ पतीने पत्नी आणि मुलीची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे घडली. चारित्र्याच्या संशयातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बबन धिंदळे (वय ३८ वर्ष), दीपाली (वय ३० वर्ष) आणि मुलगी दिप्ती (११ वर्ष) अशी या मृतांची नावे आहेत. बबनने त्याचा मुलगा रोहित (वय ९) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण या हल्ल्यातून तो बचावला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओळकाईवाडीतील क्रांतीनगर बबन धिंदळे आणि त्याचे कुटुंबीय राहत होते. बबनने रविवारी पहाटे पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा गळा आवळला. यात दीपाली आणि दिप्तीचा मृत्यू झाला. यानंतर बबनने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा रोहित बचावला आहे. बबनला पत्नी दीपालीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातूनच त्याने संपूर्ण कुटुंब संपवण्याचा कट आखला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे.