पुणे महापालिकेतील भाजपच्या कामावर समाधानी असल्याचे विधान काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाड़ी यांनी आज येथे केले. त्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या राजकारणापासून दूर असलेले पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाड़ी हे पुणे फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाविषयी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलते झाले. अनेक दिवसांनंतर त्यांनी राजकीय व्यक्तव्य केले असून पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पालिकेतील भाजपचा कारभार आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वादाबाबत विचारले असता कलमाडी म्हणाले, भाऊ रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वादामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही.

सुरेश कलमाडी यांनी अनेक दिवसांनी माध्यमासमोर त्यांची भूमिका मांडली. राजकारणात पुन्हा सक्रिय होणार का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळत वाट पहाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांच्या या सल्ल्यामुळे राजकारणात पुनरागमन करण्याचे त्यांनी सूचक संकेत दिल्याचे बोलले जात आहे.