स्थायी समिती अध्यक्षांची अजब ‘दादा’भक्ती

नेत्यांना खुश करण्यासाठी कार्यकर्ते काय बोलतील आणि काय करतील, याचा नेम नसतो. पिंपरी पालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे यांनी हेच दाखवून दिले आहे. पंढरीची वारी केली म्हणून नव्हे तर अजित पवार यांच्यामुळे आपल्याला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले, कारण अजितदादा हेच माझे विठ्ठल असल्याचे सांगत शितोळे यांनी स्वत:ची ‘दादा  भक्ती’ दाखवून दिली आहे.
सांगवीतील विविध प्रकल्पांचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले, त्यानंतरच्या कार्यक्रमात बोलताना शितोळे म्हणाले, स्थायी समितीचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी पंढरीची वारी केली होती आणि वारीनंतर मला पद मिळाले. माजी महापौर योगेश बहल यांनी विचारणा केली की, वारीमुळे अध्यक्षपद मिळाले का? मात्र, वारीमुळे नव्हे तर अजितदादांमुळे अध्यक्षपद मिळाले आहे, कारण तेच माझे विठ्ठल आहेत.  शितोळे यांनी जाहीरपणे दाखवलेली ही ‘दादा भक्ती’ ऐकून सर्वजण अवाक् झाले. कार्यकर्त्याने विठ्ठलाची उपमा दिली, तरी अजितदादांनी मात्र, या विषयावर कोणतेही भाष्य केले नाही.