हडपसर परिसरातील बेकायदा खोदकामाची पालिकेला महितीच नाही

महापालिकेच्या पथ विभागाची परवानगी न घेता खासगी कंपन्यांकडून राजरोसपणे रस्ते खोदाई होत असतानाही रस्ते खोदाई होतच नाही, असा दावा महापालिकेकडून केला जातो. मात्र हा दावा मंगळवारी फोल ठरला. हडपसर भागातील चारशे मीटर लांबीच्या रस्त्याची विनापरवाना खोदाई करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे ही रस्ते खोदाई कोणी केली याचीच माहिती पथ विभागाला नाही. त्यामुळे विनापरवाना रस्ते खोदाईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पण तोही अज्ञाताविरोधात! या रस्त्याची खोदाई कोणत्या कंपनीने केली याची उघड-उघड चर्चा होत असतानाही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे उलट-सुलट चर्चा रंगली आहे. दरम्यान, भविष्यात विनापरवाना रस्ते खोदाई केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हडपसर येथील चारशे मीटर लांबीच्या रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. महापालिकेला असलेली तीन दिवसांची सुट्टी लक्षात घेऊन ही खोदाई करण्यात आली. या संदर्भात मंगळवारी महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका हेमलता मगर यांनी प्रशासनाकडे विचारणा केली. त्यावर ही रस्ते खोदाई झाल्याची कबुली देतानाच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही खोदाई करताना लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पदपथ तोडल्याची बाबही या वेळी विरोधी पक्षनेता चेतन तुपे यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिली. त्यावर ही खोदाई झाल्याची स्पष्ट कबुली महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. विनापरवाना खोदाई केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

विनापरवाना रस्ते खोदाई केल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तो दाखल करताना अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आला आहे. ही रस्ते खोदाई कोणी केली, याची चर्चाही मुख्य सभेत करण्यात आली होती. पण प्रशासनाकडून या प्रकारे गुन्हा का दाखल करण्यात आला, याची उलट-सुलट चर्चा रंगली आहे. या रस्ते खोदाईचा भारही महापालिकेवरच पडला असून हा रस्ता पूर्ववत करण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात येईल, अशी माहिती पथ विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

शहरातील नागरिकांना विविध सेवा पुरविण्यासाठी खासगी कंपन्यांकडून रस्ते खोदाईचे प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभागाकडे सादर करण्यात आले होते. यामध्ये एमएनजीएल, महावितरणसह अन्य काही शासकीय संस्थांच्या प्रस्तावांचाही समावेश आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या कंपन्यांकडून रस्त्याची मोठी खोदाई होत असल्याचे यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट झाले होते. शेवटपर्यंत ही कामे सुरूच राहिल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांनाही होत होता. त्यामुळे खोदाईकरण कामाची नियमावली महापालिकेने तयार केली आहे.

त्यानुसार एप्रिल महिन्यापर्यंत खोदाईची कामे पूर्ण करावीत आणि त्यानंतर मे महिन्यात खोदाई झालेले रस्ते पूर्ववत करावे, असे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र मे महिना संपल्यानंतर चालू महिन्यातही रस्ते पूर्ववत करण्याचे काम महापालिका प्रशासाकडून सुरू होते.

धोरण कागदावरच

विविध सेवा पुरविण्यासाठी शहरातील खासगी कंपन्यांना सुमारे २५० किलोमीटर लांबीच्या रस्ते खोदाईला यंदा महापालिकेने मान्यता दिली आहे. त्यातील शंभर किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ववत करण्याचे काम जून महिन्यात सुरू होते. त्यामुळे रस्ते खोदाईसंदर्भात महापालिकेने केलेले धोरण हेही कागदावरच राहिल्याचेही स्पष्ट झाले आहे.