पुणे पोलिसांनी अटक केलेल्या फिल्म अँड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांवर बेकायदेशीररित्या एकत्र येणे यासह अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलीसांनी काल मध्यरात्री एफटीआयायच्या कॅम्पसमध्ये कारवाई करताना या विद्यार्थ्यांना अटक केली होती. एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी या विद्यार्थ्यांविरुद्ध धक्काबुक्की केल्याची तक्रार दाखल केली होती. रात्री बाराच्या सुमारास डेक्कन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रविण चौगुले हे पोलिसांच्या तुकडीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी १५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये तीन विद्यार्थीनींचादेखील समावेश होता. काही दिवसांपूर्वी संस्थेकडून २००८च्या विद्यार्थ्यांचे अपूर्ण प्रोजेक्ट तपासण्याचे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी प्रशांत पाठराबे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेक विद्यार्थी एफटीआयआयच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमा झाले. विद्यार्थ्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींदेखील प्रवेशद्वाराजवळ झुंबड उडाली होती. मध्यरात्री विद्यार्थीनींना अटक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी वकिलाची मदत घेतली असता पोलिसांनी त्या तीन विद्यार्थीनींना सोडून दिले. त्याचप्रमाणे सात अन्य विद्यार्थ्यांना नावातील संभ्रमामुळे सोडून दिले. सरते शेवटी पाच विद्यार्थ्यांना पोलिस डेक्कन पोलीस स्थानकात घेऊन गेले. पोलीस सदर विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवून घेताना असताना शंभरहून अधिक विद्यार्थी पोलीस स्थानकाच्या आवारात दाखल झाले होते. फौजदारी दंड संहितेच्या नियमांनुसार या विद्यार्थ्यांची पहाटे तीन वाजता ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना रात्री इतक्या उशिरा अटक करण्याचे विचारले असता,आमच्याकडे रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रार आली असता फिर्यादींचा जबाब नोंदवण्यास रात्रीचे साडे अकरा वाजले व त्यापुढील कारवाई करण्यास मध्यरात्र झाल्याचे निरीक्षक चौगुले यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.