पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेवर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. पिंपरीतील डी. वाय. पाटील दंतवैद्यकीय महाविद्यालयासह एकूण चार ठिकाणी आणि कोल्हापूरमध्ये छापा टाकण्यात आला आहे. या कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणालाही या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नाही. प्राप्तिकर विभागाचे ४० अधिकारी त्याचबरोबर पोलीस घटनास्थळी उपस्थित असून, कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या शैक्षणिक संस्थेच्या आवारात आले. त्यानंतर सर्व कार्यालयाचा ताबा घेऊन तेथे तपासणी सुरू करण्यात आली. कार्यालयातील निवडक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही संस्थेच्या आवारात प्रवेश देण्यात येत नाही. कोल्हापूरमधील कार्यालयातही सकाळी साडेआठच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचले आणि तेथेही त्याचवेळी तपास सुरू करण्यात आला.
वाचा : डी.वाय.पाटील संस्थेकडून अडीच कोटी थकबाकीचा भरणा
या छाप्यांबद्दल प्राप्तिकर विभागाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच डॉ. डी. वाय. पाटील संस्थेकडे असलेली अडीच कोटींची थकबाकी पिंपरी-चिंचवड महापालिकेने दंडासह वसूल केली होती. संस्थेच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी महापालिकेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र गरजेचे होते. मात्र, मिळकतकराची थकबाकी भरल्याशिवाय तसे प्रमाणपत्र देता येणार नाही, अशी ठाम भूमिका महापालिकेने घेतली. त्यामुळे नाक दाबताच तोंड उघडल्याप्रमाणे संस्थेने थकबाकी व दंडाची रक्कम मिळून दोन कोटी ५७ लाख रूपये निमूटपणे महापालिकेकडे जमा केले होते.
८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठातर्फे करण्यात आले होते. जानेवारीमध्ये पिंपरीत झालेले हे संमेलन त्यावरील खर्चामुळे गाजले होते. संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.