शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी पुण्यात मंगळवारी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होता. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे कार्यकर्ते सकाळी रस्त्यावर उतरले.  पुणे स्टेशन येथील साधू वासवानी चौकात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाबा आढाव यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

विधान भवनात पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यापेक्षा एखाद्या शेतकरी किंवा शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी मागणी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी बाबा आढाव म्हणाले की, शेतकयांना न्याय देण्यात हे सरकार अपयशी ठरले असून आज स्वातंत्र्य दिनी या अपयशी सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी ध्वजारोहण करता कामा नये, अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत हा लढा चालू राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.