जागतिक लोकसंख्येनुसार सहा माणसांनंतर एक भारतीय, असे प्रमाण आहे. मात्र, संशोधनाच्या अभावामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात नोबेल पारितोषिके प्राप्त करण्याचे प्रमाण एखादा टक्का तरी आहे का, असा मुद्दा पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी भोसरीत उपस्थित केला. परदेशाचे केवळ अनुकरण न करता आपल्याकडे संशोधनाची व्याप्ती वाढवली पाहिजे, त्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भोसरीतील राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेत ‘आजची शिक्षण व्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. आमदार विलास लांडे, नगरसेवक अजित गव्हाणे, विश्वनाथ कोरडे, यशवंत बाबर, प्रमोद कुटे व्यासपीठावर होते. अभ्यासाच्या योग्य पद्धती, शिक्षक व संस्थाचालकांची नैतिकता, पालकांची कर्तव्ये आदींसह सध्याच्या शिक्षणपद्धतीतील दोष सूचकपणे मांडून आयुक्तांनी सुधारणाही सुचवल्या. स्पर्धा परीक्षांची योग्य तयारी केली जात नसल्याचे सांगत प्राथमिक स्तरावरच त्याची योग्य पायाभरणी होण्याची गरज व्यक्त केली. शासनाच्या चांगल्या योजनेचा कसा बट्टय़ाबोळ केला जातो, याचे चित्रण ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात तर आपल्या आवडीचे क्षेत्रच निवडावे, असा संदेश ‘थ्रीडी इडियट्स’ मध्ये असल्याचे समर्पक उदाहरण त्यांनी दिले.
आयुक्त म्हणाले, आपली शिक्षणपद्धती गुणांच्या मागे धावणारी व पदवीला महत्त्व देणारी आहे, त्यात दोष ओळखून सुधारणा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी घोकंपट्टी न करता विषय समजून अभ्यास करावा. शॉर्टकटच्या मागे जाऊ नये. विद्यार्थी तसेच समाज घडवणाऱ्या शिक्षकांनी आचरण व्यवस्थित ठेवले पाहिजे. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद हवा. संस्थाचालकांनी नैतिकता पाळावी, पैसा कमविण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहू नये. ज्ञानमंदिरांमध्ये ज्ञानाचे धडे मिळावेत, शिक्षणाचा बाजार मांडू नये.
‘सरस्वती’च्या पूजेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न!
विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वी होण्यापेक्षा स्वत:ची क्षमता तपासून पाहावी, योग्यता धारण करणारे बनावे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेच लागतील. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या मागे लागू नये, आवडीचे क्षेत्र निवडावे. शिक्षण लक्ष्मीपूजनाचे माध्यम झाले आहे. वास्तविक, ‘सरस्वती’ ची पूजा केल्यास ‘लक्ष्मी’ आपोआप प्रसन्न होईल, अशी टिपणी डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली.