अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार २१ ऑगस्ट रोजी दिसणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या भोवती असलेल्या वातावरणाचा (कोरोना) अभ्यास करण्याची उत्तम संधी प्राप्त होणार असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञ या सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी सज्ज झालेले असतानाच भारतातील शास्त्रज्ञांच्या चमूनेही या सूर्यग्रहणासंबंधी काही अंदाज वर्तवले आहेत. कोलकाता येथील ‘आयसर’चे प्रमुख आणि पुण्यातील ‘आयुका’चे (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स) सहयोगी असलेले डॉ. दिब्येंदू नंदी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने अमेरिकेत दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याभोवतीचे वातावरण कसे दिसेल याचा अंदाज बांधला आहे.

डॉ. नंदी हे ‘आयसर-कोलकाता’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडिया’ (सीईएसएसआय) येथे कार्यरत आहेत. त्यांच्या चमूमध्ये आयसरमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह इंग्लंडमधील दुरहॅम युनिव्हर्सिटीतील एका शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.

सूर्याच्या वातावरणाच्या अत्युच्च तापमानाने गेली अनेक दशके शास्त्रज्ञांना कोडय़ात पाडले आहे. सूर्याचे वातावरण तापण्याचे एक कारण सूर्याचे गुरुत्वाकर्षण असल्याचे मानले जाते. तरीही सूर्याचे वातावरण नेमके कसे तापते याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तीव्र स्वरूपाची सौर वादळे तयार होतात आणि त्यामुळे अवकाशातील हवामान बिघडते. ही वादळे पृथ्वीपर्यंत पोहोचली, तर आपले उपग्रह, दूरसंचार व जीपीएसचे जाळे आणि विजेच्या ग्रिड्सनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सूर्याच्या वातावरणात होणाऱ्या वादळांचा अंदाज आधीच वर्तवणे आणि अवकाशातील खराब हवामानासाठी तयार राहणे आवश्यक ठरते. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांनी बांधलेला अंदाज महत्त्वाचा ठरतो, अशी माहिती ‘आयुका’ने दिली.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राने सूर्याला झाकले की सूर्याभोवतीचे एरवी फिके दिसणारे वातावरण ठळकपणे दिसू लागते. त्यामुळे या वातावरणामागे असलेले गुरुत्वाकर्षणही कळू शकते. त्यामुळे अमेरिकेत दिसणाऱ्या या ग्रहणाच्या वेळी भारतीय शास्त्रज्ञांना त्यांचे अंदाज पडताळून पाहता येणार आहेत.