आठवडाभरात दोन हजार ११३ वाहनांच्या चाकांना जॅमर; ३ लाख ६८ हजारांचा दंड वसूल

शहरातील मध्यभाग तसेच उपनगरात सम-विषम दिनांक न पाहता रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात. रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या चाकांना जॅमर लावण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांकडून दोन हजार ११३ वाहनांच्या चाकांना जॅमर बसविण्यात आला असून बेशिस्त वाहनचालकांकडून ३ लाख ६८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहराचा मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता तसेच लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, डेक्कन भागातील गोखले स्मारक चौक, फग्र्युसन रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावण्याचे प्रमाण मोठे आहे. रस्त्याच्या कडेला मोटार, दुचाकी तसेच तीनचाकी वाहने लावून अनेक जण खरेदीसाठी किंवा उपाहारगृहात जातात. सम-विषम दिनांक न पाहता रस्त्याच्या कडेला वाहने लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. पादचाऱ्यांना रस्ता देखील उपलब्ध होत नाही. शहराच्या काही भागांत पदपथावर देखील वाहने लावली जातात. विशेषत: जंगलीमहाराज रस्त्यावरील पदपथावर वाहने लावण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जंगलीमहाराज रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे पदपथांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक या रस्त्यावरील पदपथांवर वाहने लावत असल्याचे पाहायला मिळाले.

रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईसंदर्भात माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले की, सम-विषम दिनांक न पाहता रस्त्याच्या कडेला अनेक वाहनचालक वाहने लावतात. अशा वाहनचालकांमुळे कोंडी होते. पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड होते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर गेल्या आठवडय़ापासून कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेच्या शहरातील २८ विभागांना देण्यात आल्या आहेत. बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांच्या चाकांना जॅमर बसविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

शहराच्या मध्य भागातील लक्ष्मी रस्ता परिसरात अनेक जण खरेदीसाठी येतात. रस्ताच्या दुतर्फा वाहने लावली जातात किंवा मोटारीत चालकाला बसण्याची सूचना करून अनेक जण खरेदीसाठी जातात. डेक्कन भागातील गोखले स्मारक चौक (गुडलक चौक), फग्र्युसन रस्ता, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, विमाननगर परिसरात दुतर्फा वाहने लावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांच्या चाकांना जॅमर बसविण्यात येत आहे. यापुढील काही दिवस बेशिस्त वाहनचालकांच्या चाकांना जॅमर बसविण्याची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. आठवडाभरात दोन हजार ११३ वाहनांच्या चाकांना जॅमर बसविण्यात आले आहेत. जॅमरची कारवाई केल्यानंतर वाहनचालकांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. आठवडाभरात बेशिस्त वाहनचालकांकडून ३ लाख ६८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.