सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातील फुगवटा हा दरवर्षीच्या अधिसभेतील गाजणारा मुद्दा असतो. या वर्षी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात साधारण दीडशे कोटी रुपयांची वाढ झाली असून व्यवस्थापन परिषदेने ७३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सोमवारी दिली.
पुणे विद्यापीठ हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत विद्यापीठ आहे. यावर्षी विद्यापीठाचे वार्षिक अंदाजपत्रक हे साधारण ७३५ कोटी रुपयांचे असणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला. या वर्षी अधिकार मंडळांची मुदत संपल्यामुळे व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेमध्ये मोजकेच सदस्य आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पावर हरकती येण्याची शक्यता नसल्याचेच स्पष्ट होत आहे.
गेल्या चौसष्ट वर्षांत विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा जवळपास ४० पटींनी वाढला आहे. विद्यापीठाचा पहिला अर्थसंकल्प १९४९-५० या वर्षांसाठी मांडण्यात आला. त्या वेळी विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा १७ लाख रुपये होता. त्यानंतर विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षांत म्हणजे १९७३-७४ मध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा २११ लाखापर्यंत पोहोचला. १९९८ -९९ मध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४१.३२ कोटी रुपये होता. २०१४-१५ चा अर्थसंकल्प हा ५५० कोटी रुपयांचा होता. गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प हा ६०५ कोटी रूपयांचा होता.
विद्यापीठाच्या उत्पन्नातील सर्वाधिक वाटा हा वेगवेगळ्या शुल्कांचा आहे. महाविद्यालयांचे संलग्नता शुल्क, विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे परीक्षा शुल्क, मान्यता शुल्क मिळून उत्पन्नाच्या ४० टक्क्य़ांपेक्षा अधिक भाग आहे. विद्यापीठाच्या ठेवी या ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत, त्याचे विद्यापीठाला मिळणारे फक्त व्याजही ६५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्पात तरतुदू केल्या जातात. मात्र त्या वापरल्या जात नाहीत असा आक्षेप विद्यापीठाच्या अर्थकल्पावर सतत्याने घेण्यात येत आहे.