जगभरामध्ये औत्सुक्य असलेल्या ‘भागवत पुराण’ या भारतीय संस्कृतीमधील महत्त्वाच्या ग्रंथाची आंतरराष्ट्रीय चिकित्सक आवृत्ती साकारत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदूूज स्टडीज’ या केंद्राने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था दोन प्रकाराने या प्रकल्पामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
अनेक वर्षांचे अथक परिश्रम, विविध पोथ्या, हस्तलिखिते आणि टीका यांचा अभ्यास आणि संशोधनानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने साकारलेली महाभारताची चिकित्सक आवृत्ती जगभरातील प्राच्यविद्या अभ्यासक आणि संशोधकांसाठी प्रमाण मानली जाते. ही चिकित्सक आवृत्ती साकारताना उपयोगात आणली गेलेली संशोधन पद्धती ही आदर्श ठेवून काही वर्षांपूर्वी अहमदाबाद येथे ‘भागवत पुराण’ या विषयावरील चिकित्सक आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले होते. भागवत पुराणाच्या वेगवेगळ्या पोथ्या आणि टीका यांचा अभ्यास करून प्रकाशित झालेल्या या चिकित्सक आवृत्तीचा जगभर अभ्यास केला जात आहे.
भागवत पुराणाची आंतरराष्ट्रीय चिकित्सक आवृत्ती नव्याने साकारत असताना यापूर्वी झालेल्या चिकित्सक आवृत्तीचे परीक्षण करण्यात येणार आहे. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचा अनुभव असल्यामुळे ही चिकित्सा करण्याची जबाबदारी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर विश्वासाने सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पूर्वीच्या भागवत पुराणाच्या आवृत्तीचा समीक्षात्मक अभ्यास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भांडारकर संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली. दिल्ली येथील प्रा. गयाचरण त्रिपाठी, पाँडेचरी येथील संस्कृत विद्वान आणि डॉ. बहुलकर या तिघांची समिती हे चिकित्सेचे काम करणार आहे.
भागवत पुराणाच्या चिकित्सेबरोबरच भागवत परंपरेच्या इतिहास लेखनाचे कामही भांडारकर संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. भागवत परंपरेचे पाईक आणि संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भागवत परंपरेच्या इतिहास लेखनाची जबाबदारी स्वीकारली असून संस्थेचे माजी ग्रंथपाल वा. ल. मंजूळ यांचादेखील त्यामध्ये सहभाग असेल. येत्या तीन ते पाच वर्षांत भागवत परंपरेच्या इतिहास लेखनाचा प्रकल्प पूर्ण व्हावा यादृष्टीने नियोजन केले आहे. आर्थिक निधी उभा करून संस्था हा प्रकल्प सिद्ध करणार आहे, असेही डॉ. बहुलकर यांनी सांगितले.