रायगड जिल्ह्य़ातील बाळगंगा धरण घोटाळा प्रकरणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या घोटाळ्यात गुंतलेल्या आरोपींच्या घरावर मंगळवारी छापे टाकले. पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथील पाच आरोपींच्या घरांतून विभागाने महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
रायगड जिल्ह्य़ात बाळगंगा धरण घोटाळ्याप्रकरणी जलसंपदा खात्याच्या कोकण विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, ठाणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, निलंबित सहायक अभियंता राजेश रिठे, कोकण जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील आणि रायगड जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता अनंता काळोखे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पथकाने छापे टाकले. या घोटाळ्यात गुन्हा दाखल झालेल्या ११ आरोपींपैकी सहाजण सरकारी अधिकारी आहेत. तर, उर्वरित पाच जण एफ. ए. कन्स्ट्रक्शन्सचे संचालक आहेत. धरणाचे कंत्राट देताना त्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली असून धरणाच्या बांधकामाचा खर्च वाढविण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. एसीबीने तक्रार दाखल केल्यानंतर बाबर यांच्या एरंडवणे येथील स्वप्नशिल्प अपार्टमेंटमधील सदनिकेवर छापा टाकण्यात आला आहे. मंगळवारी सकाळीच या पथकाने कारवाई करून तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे यांच्या प्रभात रस्त्यावरील सदनिकेवरही छापा टाकण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या मंगळवेढा येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. निलंबित सहायक अभियंता राजेश रिठे यांची लुल्लानगर येथे सदनिका आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही कागदपत्रे जप्त केली असली तरी त्याचा तपशील देता येणार नाही, असे एसीबीच्या पुणे युनिटचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.