शहरात तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक व्यवस्थांची जी दाणादाण24pani2 झाली त्यामुळे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष हवाच कशाला, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यवस्तीत नेहमीच अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात; पण सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक उपनगरांमध्येही घरांमध्ये पाणी शिरण्याचे तसेच पाणी साठून राहण्याच्या अनेक घटना घडल्या.
तीन दिवसांच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साठून राहिले आणि वाहतुकीच्या कोंडीसह शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. वास्तविक, अशा सर्व प्रसंगांमध्ये महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने काम करणे आणि जेथे समस्या उद्भवल्या असतील त्यांचे निराकरण करणे अपेक्षित असताना शनिवार ते सोमवार असे तीन दिवस झालेल्या पावसात आपत्ता निवारण कक्षाने काय काम केले असाही प्रश्न विचारला जात आहे. मध्य पुण्यातील शिवाजी रस्ता, नऱ्हे, धायरी, सहकारनगर, कात्रज, सिंहगड रस्ता, टिंगरेनगर, रास्ता पेठ, सोमवार पेठ, पुणे स्टेशन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट परिसर, गंगाधाम, मार्केट यार्ड परिसर यासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साठून राहण्याच्या घटना घडल्या. तसेच अनेक सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी पाण्याचे लोंढे एवढे मोठे होते, की त्यात वाहनेही वाहून गेली. दुकानांमध्येही पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तसेच शहरातील बहुतेक सर्व नाले तुंबल्याचेही चित्र जागोजागी दिसत होते.
महापालिकेतर्फे दरवर्षी शहरातील नाले सफाईवर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. तरीही दर पावसाळ्यात नाले तुंबतात. शहरात दोन दिवस झालेल्या पावसानंतरही नाले तुंबले. मग नाले सफाईवर जो खर्च झाला तो नक्की कशावर करण्यात आला, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाला विचारला आहे. मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभूस यांनी पाणी साठण्याच्या समस्येबाबत मंगळवारी आयुक्तांची भेटही घेतली. तसेच नालेसफाईवर मोठा खर्च करूनही दरवर्षी ही परिस्थिती का उद्भवते, असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला. नाल्यांवर झालेली बांधकामे तसेच नाल्यांची दिशा वळवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले आहेत. त्यामुळेच पावसामुळे नाले लगेच तुंबतात याकडे संभूस यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. नाले सफाई आणि इतर यंत्रणा मोठय़ा पावसाने कोलमडतात हेच गेले तीन दिवस दिसून आले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व तयारी यासाठी जो खर्च झाला त्याचे काय, अशीही विचारणा करण्यात आली आहे.

आपत्ती निवारण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महापालिका दरवर्षी मोठा खर्च करते. मात्र शहरात मोठा पाऊस झाला, की या यंत्रणांनी केलेली कामे नागरिकांना कोठेही दिसत नाहीत. सर्वत्र पाणी साचणे, नाले तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे असे प्रकार नेमाने होतात. वास्तविक अनेक कामांवर मोठा खर्च होऊनही हे प्रकार होतात. मग आपत्ती व्यवस्थापन कक्ष नेमके काय काम करतो, याचा खुलासा प्रशासनाने करावा.
हेमंत संभूस, शहराध्यक्ष, मनसे