रानडे इन्स्टिटय़ूटच्या परिसरात चालवण्यात येणारे विद्यापीठाचे विभाग हे विद्यापीठाच्या परिसरात हलवण्याचा घाट सध्या घातला जात असून फग्र्युसन रस्त्यावरील हे मोक्याचे ठिकाण बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी या हालचाली सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग आणि परदेशी भाषा विभाग रानडे इन्स्टिटय़ूटच्या परिसरात सध्या सुरू आहेत. यातील वृत्तपत्रविद्या विभाग हा जवळपास गेली पन्नास वर्षे या परिसरात सुरू आहे. विद्यापीठातील या एका प्रतिष्ठित विभागाला सध्या पूर्ण वेळ प्रमुख नाहीत, गेली अनेक वर्षे पूर्ण वेळ शिक्षक नाहीत. विभागामध्ये पायाभूत सुविधांचाही अभाव असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांनी नुकतेच आंदोलनही केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आहे त्या परिसरातच सुविधा उपलब्ध करून देण्याएवजी हे विभाग थेट विद्यापीठाच्याच आवारात हलवण्याच्या हालचाली विद्यापीठाकडून करण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे रानडे इन्स्टिटय़ूटच्या आवाराची ओळख ही माध्यम, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचे हक्काचे ठिकाण अशी झाली होती. या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती या विभागांत तासिका तत्त्वावर अध्यापनाचे काम करत होत्या. अनुभवी व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणारी संस्था अशी ओळख या विभागाने निर्माण केली होती. मात्र, स्थलांतरामुळे विभागाची ही ओळखही धोक्यात येणार आहे.
या परिसरात चालवल्या जाणाऱ्या दोन्ही विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. पदविका अभ्यासक्रम हे सायंकाळी चालवण्यात येतात. काम करता करता शिकणाऱ्यांकडून पदविका अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जाते. शहराच्या मध्यवर्ती परिसरात सुरू असणारे हे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या अवारात स्थलांतरित केल्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीयदृष्टय़ा कोणतेही सबळ कारण नसतानाही हे विभाग विद्यापीठाच्या परिसरात हलवण्याचा घाट का घालण्यात येतो आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
फग्र्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिटय़ूट आणि त्याच्या शेजारील आर्यभूषण छापखाना या दोन्ही वास्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित झाल्या आहेत. रानडे इन्स्टिटय़ूटची इमारत ही एकशे पाच वर्षे जुनी आहे. फग्र्युसन रस्त्यावरील या मोक्याच्या जागांवर पुण्यातील बांधकाम व्यावसायिकांचे लक्षही आहेच. त्यामुळे या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच या परिसरातील विभागांचे स्थलांतर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.