समाजव्यवस्थेविषयी चीड, आईविषयी प्रेम, नातेसंबंध, आरोग्य, प्रेम, निसर्ग अशा विविध विषयांवर आपण नेहमी कविता वाचतो. पण, वाट चुकलेल्या लोकांच्यासुद्धा या विषयीच्या भावना किती चांगल्या पद्धतीने काव्यातून व्यक्त होऊ शकतात याची प्रचिती कैद्यांच्या काव्यसंग्रहातून समोर आली आहे. राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांनी लिहिलेल्या ‘काव्यबहार’ नावाचा कविता संग्रह कारागृह विभागाने तयार केला आहे. त्यामधून अनेक विषय हाताळण्यात आले आहेत.
राज्यातील विविध कारागृहात शिक्षा झालेले आणि न्यायालयीन कैदी असलेल्यांच्या १२८ कविता या ‘काव्यबहार’ मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आई आणि नातेसंबंधावर सर्वाधिक कविता आहेत. त्याचबरोबर समाज व्यवस्थेवर सुद्धा बऱ्याच कविता असून त्यामधून विविध विषय हातळण्यात आले आहेत. या कविता संग्रहामध्ये दोन हिंदी आणि दोन इंग्रजी कविता आहेत. ‘मला खूप काही करायचे आहे, पोलीस सैनिक व्हायचे पण द्यायला पैसे नाहीत’ अशा आशयाची कविता लिहून एका कवीने समाज व्यवस्थेवर भाष्य केले आहे.
याबाबत दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश कांबळे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व कारागृहांतून आलेल्या १२८ कवितांचा ‘काव्यबहार’ नावाचा काव्यसंग्रह तयार करण्यात आला आहे. प्रत्येक कवितेच्या खाली कैद्याचे नाव देण्यात आलेले आहे. या कविता संग्रहामध्ये कैद्याची ‘कवी’ म्हणून ओळख असल्यामुळे तो कोणत्या कारागृहात आहे, त्याला काय शिक्षा झाली आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. या कवितासंग्रहामध्ये राहुल मोरे या कैद्याने काढलेली चित्रे आहेत. त्याचबरोबर कविता संग्रहाचे मुखपृष्ठ सुद्धा मोरे यांनी तयार केले आहे. ही संकल्पना कारागृहाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांची असून, हे पुस्तक कारागृह विभागाने तयार केले आहे. येत्या ४ एप्रिल रोजी ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन होणार आहे.
बोरवणकर म्हणाल्या की, कैदी हा मुळात वाईट नसतो. प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात हे या कविता संग्रहातून दिसते. काही चूक झाली किंवा रागावर आवर न घालता आल्यामुळे काय होऊ शकते याची जाणीव हे पुस्तक करून देते. ‘सुधारणा आणि पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीद वाक्य आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असतात.