माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांची कबुली

केंद्रातील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली म्हणून नरेंद्र मोदी यांनी जाहिरातबाजी केली आहे. पण, त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षांत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे झाली आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी केली. मी एकटाच कार्यक्षम आहे हे दाखविण्याचा मोदी यांचा अट्टाहास असून महत्त्वाचे सर्व निर्णय पंतप्रधान कार्यालयातून घेतले जात आहेत. सर्व मंत्री हे पंतप्रधानांसमोर घाबरलेले असतात, असा दावा रमेश यांनी केला. मात्र, मोदी सरकारविरोधात आक्रमक प्रचार करण्यामध्ये काँग्रेसला अपयश आले असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यास गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी यांनी विरोध केला होता. ते मोदी खरे, की आता पंतप्रधान झाल्यानंतर ‘जीएसटी’ ही आपली उपलब्धी आहे, अशी जाहिरात करणारे मोदी खरे, असा सवाल रमेश यांनी पत्रकार परिषदेत केला. नोटाबंदीच्या निर्णयाचा मोदी यांना राजकीय फायदा झाला असला तरी अर्थव्यवस्थेला विनाशाकडे नेणाऱ्या या निर्णयातून किती काळा पैसा जमा झाला हे मात्र, पंतप्रधान आणि अर्थमंत्री सांगायला तयार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारभारावर मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. बदला आणि धमकीचे राजकारण, रोजगाराचा दुष्काळ, सामाजिक तणाव आणि जातीय दंगे, दलित-आदिवासींवर हल्ले, शेतकरी आत्महत्या, अस्पष्ट परराष्ट्र धोरण ही मोदी सरकारची उपलब्धी आहे, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या योजनांची नावे बदलून त्याचे मार्केटिंग करण्यामध्ये मोदी यांनी यश संपादन केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशाला काँग्रेसमुक्त करण्याचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल. उलट दोन वर्षांनी पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला. मोदी यांच्या राजवटीमध्ये देशात भीतीचे वातावरण आहे. सत्ता राबविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांचा वापर करून घेतला जात आहे. मोदी यांच्याकडे पाहताना लालकृष्ण आडवाणी हे उदारमतवादी वाटतात, अशी टिप्पणीही रमेश यांनी केली.

पर्यावरण रक्षण हेच मंत्र्याचे काम

पर्यावरणाचे रक्षण करणे हे पर्यावरणमंत्र्याचे काम असते. पर्यावरणविषयक कायदे कमजोर करण्यासाठीच प्रकाश जावडेकर मंत्री झाले, अशा शब्दांत जयराम रमेश यांनी जावडेकर यांच्यावर टीका केली.