लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची विभागीय अंतिम फेरी जल्लोषात

सेट आला का. लाईट्सचं काय झालं.. अशी थोडीशी धाकधूक.. उत्सुकता.. उत्साह अशा वातावरणात सुरू झालेली ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी..आवाज कुणाचा.. अशा जल्लोषात मंगळवारी संपली आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचा आवाज घुमला. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या विभागीय अंतिम फेरीत गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक मिळून महाअंतिम फेरी गाठली आहे. या फेरीत एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक आणि बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने (बीएमसीसी) तृतीय क्रमांक पटकावला.

राज्यभरातील आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी मंगळवारी झाली. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे, पृथ्वी एडिफिसचे अभय केले यांच्या उपस्थितीत झाले. या फेरीसाठी सुषमा देशपांडे, रूपाली भावे यांनी परीक्षण केले. प्राथमिक फेरीचे आव्हान पार करून आलेल्या सवरेत्कृष्ट सहा एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर झाल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जल्लोषात सुरू झालेली ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली. स्पर्धकांमध्ये रंगलेल्या चुरशीने निकालाची उत्कंठा वाढली होती.

या फेरीत दिग्दर्शन, अभिनय, संगीत अशा सर्व वैयक्तिक पारितोषिकांसह सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावून गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेने अंतिम फेरी गाठली आहे. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक एमआयटी आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘कश्ती’ या एकांकिकेला मिळाले, तर सांघिक तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बीएमसीसी महाविद्यालयाच्या ‘व्हाय शुम्ड बॉईज हॅव ऑल द फन’ या एकांकिकेला मिळाले.

अस्तित्व संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’साठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’ ची साथ मिळाली आहे, तर रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएमचे साहाय्य लाभले आहे.  स्पर्धेतील कलाकारांना संधी देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शनसारखी नामवंत संस्था ‘लोकांकिका’ स्पर्धेची टॅलेण्ट पार्टनर आहे, तर स्टडी सर्कल हे नॉलेज पार्टनर आहेत. महाराष्ट्रातील आठ केंद्रांवरून निवडलेल्या उत्कृष्ट आठ एकांकिकांमधून सवरेत्कृष्ट एकांकिका, म्हणजेच महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ निवडण्यात येणार आहे.