जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

ज्या देशात तत्त्वज्ञान, धार्मिक आस्था, सरकार आणि शासन यंत्रणेला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसेल तो देश आणि वातावरण निकोप आहे, असे कसे म्हणता येईल, असा सवाल ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी रविवारी केला. केवळ भाग्य आणि नशीब महत्त्वाचे असेच आपण मानत असू तर, मग पाप आणि पुण्याच्या हिशेबात न अडकता लोकांच्या प्रबोधनाची आवश्यकता निर्माण होते. धर्माच्या आडून सत्ता राबवू पाहणाऱ्यांपासून आपण स्वतला आणि देशाला वाचवायला हवे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास चार वष्रे झाली तरी त्यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलेल्या ‘जवाब दो’ या निषेध जागर आंदोलनानिमित्ताने कार्यक्रमात अख्तर बोलत होते. ‘नया हुकूमनामा’ ही कविता त्यांनी सादर केली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. शैला दाभोलकर या वेळी उपस्थित होत्या. जावेद अख्तर म्हणाले, अनेक जण सत्याच्या शोधात प्रवाहाविरुद्ध पोहताना आपली दिशा ठरवतात. चांगूलपणाच्या गोष्टींसाठी ते जग बदलू पाहात असतात. डॉ. दाभोलकर अशांपैकीच एक होते. जगाला एक नवा विचार त्यांनी देण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, आपल्या कर्मठ आणि परंपरांच्या जोखडात रममाण होणाऱ्या समाजाने हे समजून घेतलेच नाही. बुद्धिभेद झालेल्या डोक्यात विज्ञानाचा विचार पोहोचू शकत नाही. अंधश्रद्धेच्या मागे गेलेले मेंदू समोर दिसणाऱ्या वैज्ञानिक सत्यालाही दुर्दैवाने नाकारतात. एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे आपण दुसरीकडे मात्र हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक अंधश्रद्धा सोडत नाही. ही विसंगत मानवी वर्तणूक म्हणजे माणसाची मनोविकृतीच आहे.

अख्तर म्हणाले, ईश्वरी संकेत किंवा मनशांती वगरे मिळते म्हणून अवैज्ञानिक अशा अंधश्रद्धांना खतपाणी देणाऱ्या गोष्टींना भरीस पडणे, हे योग्य नाही. डोळे उघडून बुद्धीचा वापर करत याकडे पाहायला हवे. अघोरी, अमानवी अंधश्रद्धांचे तण काढण्यासाठी दाभोलकर यांनी कार्य केले. जादूटोणाविरोधी कायदा आणि जातपंचायतविरोधी सामाजिक न्यायाचा कायदा असे दोन कायदे होणे ही त्यांच्या आयुष्याची मिळकत असल्याची भावना शैला दाभोलकर यांनी व्यक्त केली.

हेच भारताचं वेगळेपण

सर्व धर्म सारखेच खराब आहेत. जेथे धर्म आहे अशा प्रत्येक ठिकाणी अन्याय, हिंसा, महिलांवरील अत्याचार आणि शोषण या साऱ्या गोष्टी आहेत. आम्ही विरोधी विचार ऐकून घेतो आणि विरोधाभास हादेखील सहिष्णुतेने सहन करतो. ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आमच्या रक्तातच लोकशाही आहे. आपला देश वेगळा मानला जातो तो इथल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्थेमुळे, असे सांगून जावेद अख्तर यांनी मात्र हीच आता ओळख पुसट होत चालली आहे, अशी खंत व्यक्त केली. इतरांचे चूक आणि आमचेच बरोबर अशी भूमिका असेल तर लोकशाही नांदू शकत नाही. हवेमध्ये विष पसरते तेव्हा ते प्रत्येकाच्या श्वासात जाऊ शकते. आपल्या आवाजाला देशाचा आवाज असे कुणी म्हणत असेल तर शंका यायला हवी. हे एकल गीत नाही, तर समूहगान आहे. माणसांच्या बोलण्यावर, विचारांवर आणि अभिव्यक्तीवर बंधने लादली जात आहेत. त्यापासून वेळीच स्वतला आणि देशाला वाचवूयात, असेही अख्तर यांनी सांगितले.