गणेशोत्सवामध्ये नावीन्यपूर्ण कल्पनांनी सजावटीचा आविष्कार घडविणारे प्रसिद्ध कलाकार जीवन पंढरीनाथ रणधीर (वय ५९) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे. जीवन रणधीर यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वकष्टाने शिक्षण घेत जीवन रणधीर यांनी कलेची आवड जोपासली. गेल्या चार दशकांपासून सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये त्यांनी भव्य सजावटी आणि अभिनव संकल्पनांचे चित्ररथ साकारले. अत्यल्प खर्चातील साहित्याचा वापर करून भव्य देखावे साकारणारे आणि व्यवहारापलीकडे जाऊन उत्सवावर मनापासून प्रेम करणारा मनस्वी कलाकार अशीच त्यांची ख्याती होती. दुर्मीळ रक्तगट असलेल्या जीवन रणधीर यांनी २५ पेक्षा अधिकवेळा रक्तदान केले. वैकुंठ स्मशानभूमीत रणधीर यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय-सामाजिक  क्षेत्रातील व्यक्तींसह गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

कलेच्या श्रीमंतीने नटलेले ‘जीवन’
कलाकार हा स्वान्तसुखाय असतो असे म्हटले जाते खरे; पण त्याला तो अपवाद होता. अगदी नरमाईच्या सुरात एखाद्याची फिरकी घेतली तरी ज्याची फिरकी घेतली ती व्यक्तीही अगदी दिलखुलासपणे दाद द्यायची, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जादू, केवळ कलेच्या माध्यमातून आविष्कार घडविण्यामध्येच नाही, तर जवळपासच्या माणसांमध्येही तेवढय़ाच आत्मीयतेने रमणारे असेच कलेच्या श्रीमंतीने नटलेले ‘जीवन’ रणधीर ही वल्ली विरळाच.
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवामध्ये सेवा म्हणून रांगोळी काढून सर्वाचे लक्ष वेधून घेणारे जीवन रणधीर हे अगदी मध्यरात्रीदेखील मंडईच्या कट्टय़ावर गप्पांचा फड रंगविण्यामध्ये तितकेच उत्साही असायचे. जीवन यांनी अगदी मोजक्या शब्दांत केलेल्या मार्मिक टिप्पणीमुळे दिवसभर कामाने थकलेले पत्रकार असोत किंवा सामाजिक-राजकीय कार्यकर्ते रात्री अगदी ताजेतवाने होऊन जायचे. अशाच गप्पांच्या ओघात जीवन यांनी ‘आम्हाला इतिहास सांगणारे नव्हे, तर भविष्य घडविणारे नेते हवेत’ ही केलेली कोटी अजूनही मंडई विद्यापीठातील सर्वाना ज्ञात आहे. कलेमध्येच रममाण झालेल्या जीवन यांनी कधी व्यवहार पाहिलाच नाही. नव्हे, त्यांना व्यवहार कळालाच नाही. अनेकदा त्यांच्याकडून कल्पकता घेऊन कार्यकर्ते दुसऱ्या कलाकाराकडून काम करून घ्यायचे. हे समजल्यानंतरही जीवन यांनी कधी त्रागा केला नाही की त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी अबोलाही धरला नाही. ‘ठीक आहे. दुसऱ्या कुणाला तरी काम मिळाले ना’ ही त्यांची टिप्पणीच सारे काही बोलून जायची. गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांमध्ये रणधीर लोकप्रिय होते. कला ही सेवा म्हणून सादर करताना माझ्यावरील एका मोठय़ा शस्त्रक्रियेच्यावेळी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून मदत केली होती, हेही ते अगदी आवर्जून सांगायचे.
हुतात्मा बाबूगेनू मंडळासाठी केलेला ग्रीक-रोमन-इजिप्शियन संस्कृतीचा देखावा.. शनिपार मंडळासाठी केलेला अलिबाबाचा खजिना.. रंगबिरंगी पतंग आणि छत्र्या यांची सजावट असलेला चित्ररथ.. चार वर्षांपूर्वी भारताने विश्वचषकजिंकल्यानंतर धोनी सेनेचा गौरव करणारा आकर्षक चित्ररथ,गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये केलेले रथ.. ही जीवन रणधीर यांच्या कलेची श्रीमंती दर्शविणारी उदाहरणे सांगता येतील. कामामध्ये कोणतीही तडजोड न करणारे रणधीर नेहमी ‘मटेरियल इज इम्मटेरियल; इफेक्ट महत्त्वाचा’ असे सांगायचे. हे वाक्य किती समर्पक आहे याची प्रचिती तो देखावा पूर्ण झाल्यानंतर साऱ्यांनाच येत असे. त्यांच्या कामावर खूश होऊन एका मंडळाच्या अध्यक्षाने चक्क टेलरला बोलावून त्यांचे माप घेतले आणि रणधीर यांना सफारी शिवून देण्याचा हुकूम सोडला. तेव्हा ‘सफारी जाऊद्या आधी मला काम पूर्ण करु द्या’ असे प्रेमाने सांगणारे रणधीर यांनी आपले ‘जीवन’ खरोखरीच सार्थकी लावले असेच म्हणावे लागेल.