पुण्यात गेले आठ-दहा दिवस वादळी पावसाने हजेरी लावली. गेल्या गुरूवार ते रविवारच्या दरम्यान झालेल्या पावसाने तर अनेक भागात पाणी-पाणी झाले. मात्र, असे होऊनही हा पाऊस धरणांतील साठय़ासाठी फारसा उपयोगी ठरलेला नाही. या काळात पुण्यासाठीच्या धरणांच्या साठय़ात जेमतेम एक-दोन टक्के इतकीच वाढ झाली. सध्या पुण्यासाठीच्या चार धरणांमध्ये मिळून एकूण उपयुक्त साठा ५५.५२ टक्क्य़ांच्या आसपास आहे.
पुण्यात या हंगामात पावसाने विशेष हजेरी लावलीच नाही. मात्र, अखेरच्या टप्प्यात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाळ्यात फारसा पाऊस न पडल्याने धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा केवळ ५० टक्क्य़ांच्या आसपास कायम राहिला. त्यानंतरच्या वादळी पावसाने चांगली हजेरी लावली. त्याच्यामुळे पाणीसाठय़ात वाढ होईल, अशी आशा होती. मात्र, आताच्या पावसामुळे ती पूर्ण झाली नाही. गुरूवार ते रविवारच्या दरम्यान पुण्याच्या विविध भागात वादळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी आणि रविवारी तर काही सरी इतक्या मोठय़ा आल्या की रस्त्यांवर कितीतरी वेळ ओढय़ासारखे पाणी वाहिले. अशाच प्रकारचा पाऊस शुक्रवारी आणि शनिवारी धरणांच्या क्षेत्रातही झाला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तीनही धरणांवर या पावसाची नोंद प्रत्येकी सुमारे ६० मिलिमीटर इतकी झाली. मात्र, त्यानंतरही धरणांच्या पाणीसाठय़ात केवळ एक ते दोन टक्के इतकीच वाढ झाली. ही तीन धरणे आणि टेमघर धरण मिळून चारही धरणांचा उपयुक्त साठा मंगळवारी सायंकाळी १६.१८ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका होता. एकूण उपयुक्त साठय़ाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ५५.५२ टक्के इतके आहे.

‘‘सप्टेंबरची अखेर आणि ऑक्टोबर महिन्यात पडलेला पाऊस वादळी स्वरूपाचा होता. हा पाऊस सर्वदूर असा नसतो, संततधारही नसतो. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून धरणांच्या साठय़ात विशेष वाढ होत नाही. तेच या वेळी पाहायला मिळाले. धरणांच्या साठय़ात वाढ होण्यासाठी ऐन पावसाळ्यात पडतो तशा संततधार पावसाची आवश्यकता आहे.’’
पुणे वेधशाळा

पुण्यासाठीच्या धरणांमधील उपयुक्त साठा (टीएमसीमध्ये)
धरणाचे नाव        साठा            टक्केवारी
खडकवासला        ०.६७            ३३.७१
पानशेत                ७.२३            ६७.८८
वरसगाव            ६.६०            ५१.५१
टेमघर                 १.६९            ४५.५०
एकूण                १६.१८             ५५.५२