कमला नेहरु रुग्णालयात कमी दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार असून या ठिकाणी १५ डायलिसिस मशिन्स बसवण्यात येणार आहेत. रुग्णांना या केंद्रात ७५० ते १२०० रुपयांत डायलिसिस करता येईल.
पालिकेसह अरुणा नाईक मेमोरिअल फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर यांच्यातर्फे ही सुविधा दिली जाणार आहे. या केंद्रात डायलिसिसची किंमत ४०० रुपये ठेवण्यात येणार असून डायलिसिससाठी वापराव्या लागणाऱ्या डायलायझर, टय़ुबिंग, सिरिंजेस आणि काही औषधे या वस्तू ७५० ते ८०० रुपयांपर्यंत मिळतील. बाजारात या वस्तू (कंझ्युमेबल्स) साधारणत: १५०० रुपयांपर्यंत मिळतात. केंद्राचे अध्यक्ष नितीन नाईक म्हणाले, ‘‘आम्ही गेली चार वर्षे या केंद्रासाठी पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात ही सुविधा सुरू करता येईल. ज्या व्यक्तींना आठवडय़ात दोनदा किंवा तीनदा असे वारंवार डायलिसिस करावे लागते त्यांनी आणलेल्या डायलिसिससाठीच्या काही वस्तू केंद्रात जतन करुन त्या पुन्हा त्याच रुग्णासाठी वापरता येतात. यामुळे रुग्णाला दरवेळी प्रत्येक वस्तू नव्याने खरेदी करावी लागत नाही. या वस्तू जास्तीत जास्त ६ वेळा वापरता येऊ शकतात. खासगी केंद्रात प्रत्येक डायलिसिससाठी अंदाजे ३ हजार रुपये खर्च येतो, परंतु या केंद्रात रुग्णांना फक्त ७५० ते १२०० रुपये भरावे लागतील.’’
डायलिसिस सुविधेचा लाभ सर्व रुग्णांना मिळणार असला तरी केंद्रातील १५ मशिन्सपैकी २ मशिन्स एचआयव्हीबाधित किंवा हिपेटायटिसच्या रुग्णांसाठी राखून ठेवली जातील. तसेच, उर्वरित मशिन्सवर शहरी गरीब योजनेचे लाभार्थी आणि गरजू रुग्णांना प्राधान्य दिले जाईल, असेही नाईक म्हणाले. कमला नेहरु रुग्णालयात संस्थेतर्फे सीटी स्कॅन सेंटर देखील चालवले जात असून त्यात ८०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत सीटी स्कॅन चाचणी करुन मिळते. बाहेर या चाचणीसाठी ३ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.