नायडू संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय आणि कमला नेहरु रुग्णालय येथे डेंग्यूच्या चाचण्या सुरू करण्यासाठीची उपकरणांची निविदा प्रक्रिया झाली असून येत्या दहा दिवसांत पालिकेला चाचणीची उपकरणे मिळणे अपेक्षित आहे. शहरात बुधवारी डेंग्यूचे ८ संशयित रुग्ण सापडले, तर जुलै महिन्यात आतापर्यंत ६९ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले आहेत.
गेल्या महिन्यातील संशयित डेंग्यूरुग्णांपेक्षा या महिन्यातील रुग्णसंख्या ६ पटींनी वाढली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे १०७ संशयित रुग्ण सापडले आहेत. सध्या ससून आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) या दोन शासकीय केंद्रात डेंग्यूची चाचणी होते. डेंग्यूच्या चाचण्या करण्यासाठी राज्यात २६ ठिकाणी शासकीय केंद्रे (सेंटिनेल सव्र्हेलन्स सेंटर) चालवली जात असली तरी ही यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे आणखी ९ ठिकाणी डेंग्यू चाचणी केंद्रे सुरू करण्याचा आरोग्य विभागाचा प्रस्ताव होता. त्यात पालिकेच्या नायडू व कमला नेहरु रुग्णालयाचा समावेश होता, परंतु डेंग्यूच्या चाचण्यांसाठी लागणारी ‘एलायझा रीडर’ आणि ‘वॉशर’ ही उपकरणे या ठिकाणी नाहीत. ही उपकरणे जून अखेरीस उपलब्ध करुन देऊ असे आरोग्य प्रमुखांनी सांगितले होते. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ात ती उपलब्ध होतील असे चित्र आहे.
पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘नायडू व कमला नेहरु या दोन्ही रुग्णालयांत डेंग्यू चाचण्यांच्या उपकरणांसाठीची निविदा प्रक्रिया झाली आहे. पुढील ८ ते १० दिवसांत उपकरणे पालिकेला मिळतील व २० ऑगस्टपासून या ठिकाणी डेंग्यू चाचण्या सुरू होऊ शकतील. या चाचण्या करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ पालिकेकडे उपलब्ध आहे.’
महिना        संशयित डेंग्यूरुग्ण
जानेवारी             ११
फेब्रुवारी              ०८
मार्च                   ०४
एप्रिल                 ०१
मे                       ०३
जून                    ११
जुलै                    ६९
—–
स्वाइन फ्लूचे ६ रुग्ण
बुधवारी शहरात स्वाइन फ्लूचे २ रुग्ण सापडले असून सध्या शहरात उपचार घेणाऱ्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ६ झाली आहे. या ६ पैकी २ रुग्ण वॉर्डात उपचार घेत असून चौघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाइन फ्लूचे ८२८ रुग्ण सापडले असून त्यातील ९० रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७३३ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले.