दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापाठातील छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैया कुमार याची उद्या( २४ एप्रिल) बालगंधर्व रंगमंदिरात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला चौदा विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. लोहगांव विमानतळावर आगमन झाल्यापासून कन्हैया कुमारला पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे, तसेच सभास्थानी संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीतर्फे कन्हैया कुमार याची पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेसाठी ते ठिकाण योग्य नसल्याचे संयोजकांना सांगण्यात आले. त्यामुळे संयोजकांनी अन्य ठिकाणी सभेचे आयोजन करावे, तसेच ज्या ठिकाणी सभा आयोजित केली जाणार आहे, त्याअनुषंगाने संयोजकांना काही अटींची पूर्तता करावी लागेल, असे पोलिसांकडून कळविण्यात आले.त्यानुसार उद्या (२४ एप्रिल) बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी एक वाजता कन्हैया कुमार याची सभा आयोजित केली जाणार आहे.
सभेच्या बंदोबस्ताबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त सी.एच.वाकडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की,  बालगंधर्व रंगमंदिराची आसनक्षमता नऊशे आहे.व्यासपीठावर वीस जण बसणार आहेत. संयोजकांच्या ओळखीच्या व्यक्तींना सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लोहगांव विमानतळावर कन्हैया कुमारचे आगमन झाल्यापासून त्याला पोलीस संरक्षण पुरविण्यात येईल. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चौदा विद्यार्थी संघटनांनी सभेला पाठिंबा दिला आहे, तर पाच ते सहा विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे.यापूर्वी सभेसाठी परवानगी मागणारा अर्ज पोलिसांकडे पाठविण्यात आला नव्हता. त्यामुळे परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. संयोजकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, आठ पोलीस निरीक्षक, बावीस सहायक निरीक्षक, १२० पोलीस शिपाई, दहा महिला पोलीस शिपाई, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकडय़ा आणि वज्र पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त वाकडे यांनी सांगितले.

कन्हैयाकुमारला नोटीस
कन्हैयाकुमारला आक्षेपार्ह विधान करु नये,अशी नोटीस पोलीस लोहगांव विमानतळावर त्याला बजावतील. लोहगांव विमानतळ ते बालगंधर्व रंगमंदिरापर्यंतच्या मार्गावर पोलिसांची पथके तैनात करण्यात येणार आहेत.सभेला विरोध करणाऱ्या पाच ते सहा संघटनेच्या कार्यकर्त्यांंना सीआरपीसी १४४ नुसार नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, कन्हैयाकुमार याची सभा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असून तो फर्गसन महाविद्यालय आणि एफटीआय येथे भेट देणार नाही, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.