शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसच्या दरवाजातून तोल जाऊन पडल्याने बालवाडीत शिकणारी पाच वर्षांंची मुलगी मृत्युमुखी पडली. लोहगांव येथील हवाई दलाच्या वसाहतीच्या प्रवेशद्वाराच्या परिसरात गुरुवारी ( २४ जून) दुपारी ही दुर्घटना घडली.
अवनी धर्मेद्रकुमार (वय ५, रा. हवाई दल अधिकारी वसाहत, लोहगांव) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसचालक बाळू नामदेव हाटकर (वय २६, रा. मोझे चाळ, लोहगांव) याला अटक करण्यात आली. पोलीस हवालदार बाळू खांदवे यांनी यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनीचे वडील हवाई दलात अधिकारी आहेत. लोहगांव येथील हवाई दलातील कर्मचाऱ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या शाळेत ती बालवाडीत शिकत होती. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर अवनी शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या मिनीबसमधून घरी निघाली. बसचालक हाटकर याने बस हवाई दलाच्या वसाहतीच्या प्रवेशद्वारात थांबविली. त्यावेळी दरवाजातून उतरणाऱ्या अवनीचे दफ्तर अडकले आणि ती तोल जाऊन पडली.
तिच्या डोक्याला दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अवनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान ती मरण पावली. अवनीला अंतर्गत दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक तोगरवाड तपास करत आहेत.

नियमावालीकडे दुर्लक्ष
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भात नियमावली क रण्यात आली आहे. विद्यार्थी वाहतुकीत नियमावलीत सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: बालवाडीतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसमध्ये काळजीवाहू कर्मचारी नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुलांना बसच्या दरवाजात खाली उतरवित असताना कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, शालेय विद्यार्थी वाहतूक क रणारे बसचालक आणि ठेकेदार या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लोहगांव येथील दुर्घटनेमागे बसचालक आणि कर्मचाऱ्याचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे पोलिसांनी सांगितले.