पुण्याला पाणीपुरवठा करणाऱया खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये ४६.३९ टक्के पाणीसाठा झाला असून, खडकवासला धरण ९८.४० टक्के भरल्याने मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून २५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा खात्याकडून देण्यात आली. पुण्यात मंगळवारी सकाळी साडेआठपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत २२ मिलीमीटर पाऊस पडला. बुधवारीही पुण्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या १३.५ टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला असून, संततधार पावसामुळे त्यात वाढ होते आहे. खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे
टेमघर ६२ मिमी
पानशेत ३८ मिमी
वरसगाव ३४ मिमी
खडकवासला १८ मिमी