पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार ही धरण परिसरात आठवड्याभरापासून संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली. खडकवासला धरण १०० टक्के भरले असून त्यातून सोमवारी सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी याची दक्षता घ्यावी, तसेच नदी पात्रालगत असणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने काढून घ्यावीत, असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चार ही धरणात मिळून २१.१३ टिएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरणामध्ये तब्बल ७२ टक्के पाणी साठा जमा झाला आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. यंदा सततच्या पावसामुळे पाणी साठ्यात चांगल्या प्रकारे वाढ झाल्याने पुणे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्यात आनंदाचे वातावरण दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणपरिसरात सर्वाधिक १२३ मिमी पाऊस झाला. अद्यापही धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी पाणी सोडावे लागू शकते, अशी माहितीही पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.