निगडीतील पूर्णानगर भागातून शनिवारी (२३ सप्टेंबर) अपहरण करण्यात आलेल्या ओम खरात या शाळकरी मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना सोमवारी सायंकाळी यश आले. अपहरण करण्यात आल्यानंतर ओमच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी पालकांकडे ६० लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

निगडीतील पूर्णानगर भागात घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षांच्या ओम संदीप खरात याचे मोटारीतून आलेल्या आरोपींनी अपहरण केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी निगडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या संवेदनशील गुन्ह्य़ाचा पोलिसांनी तपास सुरू केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांढुरके, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकरराव अवताडे यांनी तपास सुरू केला. दरम्यान, संदीपच्या वडिलांच्या मोबाइलवर अपहरणकर्त्यांनी साठ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास ओमच्या जीवाला धोका आहे, अशी धमकी त्यांनी दिली होती.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्तरवींद्र कदम यांचे या गुन्ह्य़ाच्या तपासावर लक्ष होते. अपरणकर्त्यांनी धमकी दिल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी पुणे शहर, तसेच शेजारच्या जिल्ह्य़ात तपास सुरू केला होता. तांत्रिक तपास, खबऱ्यांची मदत घेण्यात आली होती. पोलीस मागावर असल्याची कुणकुण अपहरकर्त्यांना लागली होती. ओमला निगडी परिसरात सोडून सोमवारी सायंकाळी  अपहरणकर्ते सोडून पसार झाले. ओमला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली. या गुन्ह्य़ाच्या तपासाविषयी अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. ओमची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत, असे शुक्ला यांनी सांगितले.

ओमचा पुनर्जन्म

पोलिसांकडून ओमचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र तपास सुरू होता. ओम आमच्यापासून ७२ तास दूर होता. त्याची काळजी वाटत होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे ओमची सुखरूप सुटका झाली. पोलिसांमुळे ओमचा पुनर्जन्म झाला, अशी भावना संदीप खरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले.