‘‘पुण्यात ३५ टक्के महिला हृदयविकाराने ग्रस्त आहेत. पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २६ टक्के महिला हा आजार झाल्यानंतर एका वर्षांत मरण पावतात. पुरुषांमध्ये मात्र हे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे १९ टक्के आहे. असे असूनही अनेक महिलांना या आजाराचा धोका असल्याची जाणीवच नाही,’’ अशी माहिती डॉ. प्रिया पालिमकर यांनी महिला वैद्यकीय व्यावसायिकांच्या चर्चासत्रात व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे संघटनेच्या प्रियदर्शिनी लेडीज विंग या महिला शाखेने महिला वैद्यकीय व्यावसायिकांच्या एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या वेळी शहरातील महिला डॉक्टर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. त्यात डॉ. पालिमकर यांनी ही माहिती दिली. या वेळी डॉ. सोनल दीक्षित, डॉ. रूपा अगरवाल, डॉ. दीपा वाघ, डॉ. मनीषा बोबडे उपस्थित होत्या.
महिलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज असून पुरुषांच्या आजारांपेक्षा त्यांच्या आजारांसाठी वेगळे उपचार करण्याची आवश्यकता आहे, असेही मत या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
डॉ. पालिमकर यांनी पुरुष व महिलांमधील रक्तवाहिन्यांशी संबंधित हृदयविकारावर सादरीकरण केले. त्यात त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली. ‘मेनोपॉज न आलेल्या महिला या आजारापासून दूर असतात, असे नाही. त्याचप्रमाणे पूरक अन्न म्हणून व्हिटॅमिन घेतल्यानेही धोका कमी होत नाही. ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर महिलांनी विश्वास ठेवू नये,’ असा सल्लाही त्यांनी दिला.
डॉ. प्रतिभा पाठक यांनी गेस्टेशनल डायबिटीस मेलिट्स (जीडीएम) या गर्भवती असताना निदान केल्या जाणाऱ्या मधुमेहाबाबत सादरीकरण केले. त्या म्हणाल्या, ‘जीडीएममुळे वैद्यकीय व्यावसायिकांना नवीन पिढीच्या सवयी बदलण्याची संधी मिळते. जगभरात दोन ते नऊ टक्के महिलांमध्ये तो आढळतो. परंतु, भारतात हे प्रमाण १५ टक्के आहे. यामुळे भारतीयांना अत्यंत धोका असलेले रुग्ण म्हणून ओळखले जाते.’
डॉ. शोना नाग यांनी ‘महिलांमधील कर्करोग आणि प्रतिबंध’ या विषयावर सादरीकरण केले. त्या म्हणाल्या, ‘आपण कर्करोगाच्या सार्वत्रिक प्रसाराच्या काठावर आहोत. दहापकी प्रत्येक एका भारतीय व्यक्तीला आयुष्यात कर्करोग होऊ शकतो. दरवर्षी कर्करोगामुळे तीन ते साडेतीन लाख भारतीय मृत्यू पावतात. संयमित जीवन आणि स्वत:ची काळजी घेऊन कर्करोग टाळता येऊ शकतो. भारतीय आहार हा कर्करोग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.’
डॉ. अनुजा मुळे यांनी ‘अतितणावावरील अनोखा उपचार’ या विषयावरील सादरीकरण केले. डॉ. उमा दिवटे, डॉ. धनश्री वायाळ, डॉ. वैशाली पाठक, डॉ. माधुरी जोगळेकर, डॉ. प्रांजली गाडगीळ आणि डॉ. संगीता खेनट यांनी विविध सत्रांचे अध्यक्षस्थान भूषविले.