न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने मोटारीवर लाल व अंबर दिव्यांच्या वापराबाबत एप्रिलमध्ये नवे आदेश काढले. दिव्यांबाबतच्या नव्या नियमानुसार महापौर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या मोटारींना आता लाल दिवे वापरण्याची परवानगी नाही. त्यांच्यासाठी अंबर दिव्यांची परवानगी आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी अंबर दिव्यांची परवानगी असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना हे दिवेही नाकारण्यात आले आहेत. मात्र, सद्यस्थिती पाहिल्यास नवी नियमावली धुडकावून पूर्वीप्रमाणेच काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दिव्यांचा सोस कायम आहे.
वाहनांवरील लाल व अंबर दिवे लावण्याबाबत राज्य शासनाकडून ४ एप्रिलला सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. वाहनांच्या टपावरील दिव्यांबाबत सुधारित अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने सूचनाही काढल्या आहेत. अधिसूचनेनुसार ज्या वाहनांना दिवा वापरण्याची परवानगी नाही, अशांनी पूर्वीच्या शासन निर्णयानुसार दिवा लावला असल्यास तो तातडीने काढावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लाल दिवा वापरणाऱ्या अनेकांना अंबर दिवा वापरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे काहींना अंबर दिवाही वापरण्याची परवानगी नाही.
पालिकांच्या महापौरांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पूर्वीच्या नियमानुसार लाल दिवा होता. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाचे प्रमुख या नात्याने पालिका आयुक्तही लाल दिव्यांचा वापर करीत होते. सुधारित अधिसूचनेनुसार आता त्यांना लाल दिवा वापरता येणार नाही. मात्र, लाल दिव्यांचा सोस अद्यापही सुटू शकलेला नाही. राज्य शासनाकडून व आरटीओकडून संबंधित विभागांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांनाही केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.
दिवे वापरण्याची परवानगी कुणाला?
लाल दिवा (फ्लॅशरसह)
– राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विभागांचे मंत्री, विधान मंडळाचे विरोधी पक्षनेते, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
——–
लाल दिवा (फ्लॅशरविना)
– विधानसभा उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, राज्यमंत्री, मुख्य सचिव, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त, लोकायुक्त व उपलोकायुक्त, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे अध्यक्ष, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त.
——–
अंबर दिवा (फ्लॅशरविना)
अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, अपर मुख्य सचिव पदावरील समकक्ष अधिकारी, पोलीस महासंचालक व त्या पदावरील समकक्ष अधिकारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष (कार्यक्षेत्रात मर्यादित), ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांचे महापौर (कार्यक्षेत्रात मर्यादित), प्रधान मुख्य वनसंरक्षक, विभागीय आयुक्त (कार्यक्षेत्रात मर्यादित), प्रमुख जिल्हा न्यायाधीश (कार्यक्षेत्रात मर्यादित).
या शिवाय शासकीय, निमशासकीय सेवेतील वाहनांना फ्लॅशरसह अंबर दिवा वापरण्याची परवानगी आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना निळा दिवा, रुग्णवाहिकेसाठी जांभळ्या काचेतील लुकलुकणारा लाल दिवा, आपत्कालीन व्यवस्थेतील व आणीबाणी व्यवस्थापनासाठीच्या वाहनांना लाल, निळा व पांढरा असा बहुविध रंगाचा दिवा वापरण्याची परवानगी आहे.