पहिली ते आठवीच्या तासिकांमध्ये घट

भाषा, कला आणि शारीरिक शिक्षण हे व्यक्ती जडणघडणीसाठीचे शाळेतील सर्वाधिक महत्त्वाचे विषय. मात्र या विषयांतल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. पहिली ते आठवीसाठी  आठवडय़ाच्या तासिकांमध्ये घट झाली असून आता ५० ऐवजी ४५ तासिका असणार आहेत. त्यामुळे भाषा, कला, शारीरिक शिक्षण या विषयांचा अभ्यास कमी होणार आहे.

नव्या वर्षांचे शैक्षणिक वेळापत्रक, विषयानुसार तासिकांची आखणी कशी असावी याचे नियोजन विद्या प्राधिकरणाने जाहीर केले आहे. त्यानुसार आठवडय़ाच्या तासिकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी एक तासिका ३५ मिनिटांची याप्रमाणे आठवडय़ाला पन्नास तासिका घेणे बंधनकारक होते.  आता मात्र आठवडय़ाच्या तासिका ४५ असतील.

बदल काय?

पहिली आणि दुसरीसाठी मराठीच्या तासिका आता १८ ऐवजी १५ असतील. शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका असणार आहेत. तिसरी आणि चौथीला मराठीसाठी १३ ऐवजी १२ तासिका, शारीरिक शिक्षणासाठी ५ ऐवजी ३, कलेसाठी ४ ऐवजी ३ आणि कार्यानुभवासाठी ५ ऐवजी ४ तासिका करण्यात आल्या आहेत. पाचवी आणि सहावीसाठी प्रथम भाषा आणि तृतीय भाषेसाठी ७ ऐवजी ६ तासिका असणार आहेत. द्वितीय भाषेच्या तासिका वाढवण्यात आल्या असून त्या ४ ऐवजी ६ करण्यात आल्या आहेत. परिसर अभ्यासासाठी १३ ऐवजी ११ तासिका असणार आहेत. सहावीपासून पुढील वर्गासाठी शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव या विषयांच्या तासिका मोठय़ा प्रमाणावर कमी करण्यात आल्या असून त्या ८ ऐवजी ३ करण्यात आल्या आहेत. सहावी ते आठवीसाठी प्रथम भाषा, तृतीय भाषा, सामाजिक शास्त्रे यांसाठी ७ ऐवजी ६ तासिका असतील, द्वितीय भाषेसाठी ४ ऐवजी ६ तासिका असतील. विज्ञानाच्या तासिकांमध्ये वाढ करण्यात आली असून त्या ६ ऐवजी ७ करण्यात आल्या आहेत. शारीरिक शिक्षण आणि कला विषयाच्या तासिका ४ ऐवजी २ आणि कार्यानुभवाच्या ४ ऐवजी ३ तासिका असतील.

संमिश्र प्रतिक्रिया

या बदलांबाबत शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पूर्ण शंभर गुण असलेल्या विषयांना अधिक वेळ दिल्यामुळे या विषयांना न्याय मिळत असल्याची भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. त्याच वेळी कला, शारीरिक शिक्षण या विषयांच्या प्राथमिक वर्गाच्या तासिका कमी केल्यामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. ‘लहान मुले खेळ आणि कलेतून अधिक शिकतात. या तासिका त्यांना आवडतात. त्यातून ती व्यक्त व्हायला शिकतात अशा वेळी या तासिका कमी करणे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर हिंदीसाठी तासिका वाढवण्याचेही कारण कळू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केली आहे.