संगणक विक्री करणाऱ्या दुकानाचे शटर तोडून सात लॅपटॉप लंपास करणाऱ्या चोरटय़ाला पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून सात लॅपटॉप, तीन मोबाईल संच आणि चांदीची नाणी असा माल जप्त करण्यात आला.
आकाश पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. पाटोळे हा सराईत चोरटा आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचे आठ गुन्हे दाखल आहेत. भवानी पेठेत अक्षय गवाडिया (वय ३२) यांचे संगणक विक्रीचे दुकान आहे. सहा मे रोजी मध्यरात्री पाटोळे याने गवाडिया यांच्या दुकानाचे शटर उचकटून सात लॅपटॉप, तीन मोबाईल संच, चांदीची नाणी असा माल लांबविला होता.
खडक पोलीस ठाण्यात गवाडिया यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्याअनुषंगाने तपास पथकातील पोलीस शिपाई अमोल पवार यांना पाटोळे याने गवाडिया यांच्या दुकानात चोरी केल्याची माहिती मिळाली. पाटोळे याला सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि चांदीची नाणी असा ७५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, तुकाराम लांधी, अनंत व्यवहारे, अमोल पवार, अजय थोरात, महेंद्र पवार, संतोष मते, इम्रान नदाफ यांनी ही कारवाई केली. पाटोळे याला न्यायालयाने सोमवापर्यंत ( १३ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.