‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वकिलांनी अश्लील शेरेबाजी केल्याचे आरोप करणारे कलाकार मधुरा वेलणकर आणि चिन्मय मांडलेकर यांच्या विरोधात पुणे बार असोसिएशनच्या वतीने ३१ जानेवारीला शिवाजीनगर न्यायालयात बदनामीचा खासगी फौजदारी दावा दाखल करण्यात येणार आहे. याचबरोबर सोशल मीडियावर पुणे बार असोसिएशनच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधातही दावा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती बारचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास ढगे-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संबंधितांना ३१ तारखेपर्यंत माफी मागण्यास वेळ देत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुणे बार असोसिएशनच्या वकिलांसाठी गेल्या शुक्रवारी रात्री पुण्यातील टिळक स्मारक येथे ‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. या प्रयोगादरम्यान वकिलांकडून अश्लील शेरेबाजी केल्यामुळे काही काळ नाटक थांबवावे लागले होते, असे चिन्मय मांडलेकर यांनी फेसबुकवर लिहिलेल्या मजकुरात म्हटले होते. यावर पुणे बार असोसिएशनकडून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि नाटकाच्या प्रसिद्धीसाठी आरोप केला जात असल्याचे सांगण्यात आले. याबाबत कलाकारांनी मंगळवापर्यंत माफी मागावी, अशी मागणी पुणे बारकडून करण्यात आली होती. मात्र, कलाकारांनी माफी न मागितल्याने असोसिएशनने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अ‍ॅड. ढगे-पाटील यांनी सांगितले की, अद्यापही सोशल मीडियावर पुणे बार असोसिएशनची बदनामी सुरू आहे. याप्रकरणी मांडलेकर, वेलणकर या कलाकारांबरोबरच, मराठी वृत्तवाहिनी, सोशल मीडियावर पुणे बारची बदनामी करणारे राहुल रानडे व इतरांच्या विरोधात बदनामीचा फौजदारी दावा दाखल करण्यात येणार आहे.

पुणे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आजतागायत आमच्याशी कोणत्याही स्वरूपाचा वैयक्तिक संवाद साधलेला नाही. आमच्याविरोधात दावा ठोकला जाणार असल्याचे आम्हाला माध्यमांकडूनच समजले. यासंदर्भात कायदेशीर कागदपत्रे हाती आल्यानंतर निर्णय घेऊ.
– चिन्मय मांडलेकर (अभिनेता)