लोकमान्यांवरील चित्रपटाचे शिवधनुष्य पेलताना त्या काळातील वेशभूषेवर भर दिला. पगडी हे लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वेगळेपण. ही लोकमान्यांची पगडी तीनदा बांधून घेतली होती. टिळकांच्या काळात तांबडय़ा रंगाचा डाय उपलब्ध नव्हता. त्यामुळे गेरूच्या पाण्यात खादीचे कापड बुडवून मग ती पगडी बांधली जायची. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसाठी ५६ पगडय़ा बांधल्या. फारसे खर्चिक नसले तरी एक पगडी तयार करायला तीन दिवस लागले. दीडशे कलाकारांची वेशभूषा करण्यासाठी तब्बल ८ किलोमीटर खादीचा तागा लागला. नेमका त्याचवेळी राज्य सरकारने ‘एलबीटी’ (स्थानिक संस्था कर) लागू केल्याने खर्चामध्ये वाढ झाली. त्यामुळे ‘एलबीटी’ने ‘एलबीटी’चे (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक) बजेट वाढले.
 ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोमवारी ही आगळीवेगळी माहिती दिली. सुबोध भावे याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये या दोघांनी चित्रपटाविषयीचे अनुभवकथन केले.
अर्थात काही दुकानदारांनी मागच्या दाराने आम्हाला खादी पुरविली. पण, ‘एलबीटी’चा फटका बसायचा तो बसला आणि चित्रपटाचे बजेट वाढले हे आता निदर्शनास आले आहे हे ओम राऊत यांनी सांगितले. लोकमान्यांची पगडी ही पुणेरी पगडीपेक्षा वेगळी होती. त्यांच्या पगडीची पुढे असलेली झालर कापून टाकलेली होती. कमळ आतमध्ये लपलेले असायचे. १८८० च्या सुमारास लोकमान्यांचे पगडीतील दुर्मिळ छायाचित्र उपलब्ध झाले आणि आम्हाला ही पगडी नेमकी कशी आहे यासंबंधीचे दिशादर्शन झाले. अशा स्वरूपाची वैशिष्टय़पूर्ण पगडी बांधणारे कारागीर केवळ पुण्यातच आणि तेही हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत, असेही ओम राऊत यांनी सांगितले.
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे सुबोध भावे यांनी सांगितले. पांढऱ्या कागदावर काळी शाई उमटविण्याचे महत्त्व त्यांना पटले होते. लोकमान्यांवरचा चित्रपट हा केवळ लोकोत्तर व्यक्तीवरचा नाही तर, देशावर उत्कट प्रेम करणाऱ्या आणि स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या वृत्तीचा चित्रपट आहे. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ आणि ‘सत्तांतर म्हणजे सूड उगविणे नव्हे’ ही त्यांच्या अग्रलेखांची शीर्षके आजही लागू पडतात, असे सांगत सुबोध भावे यांनी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सात महिने कसून व्यायाम केला असल्याचे सांगितले.
 मिशीची अडचण झाली
झुपकेदार मिशी हे लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़. भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या टिळकांना ती शोभून दिसत होती. मला मात्र, या मिशीची अडचणच झाली. भूक लागल्यावर काही खाताना मिशी तोंडात यायची. तर, चहादेखील अगदी मिशीतून गाळूनच पोटामध्ये जायचा, अशी गंमत सुबोध भावे यांनी सांगितली. ‘बालगंधर्व’ चित्रपटात लोकमान्य दिसतात. तसे ‘लोकमान्य’ चित्रपटात बालगंधर्व आहेत का असे विचारले असता, ‘आता मलाच बालगंधर्व म्हणून ओम उभा करतो की काय’, अशी भीती वाटत होती, असेही त्यांनी सांगितले.