स्वाईन फ्लू नियंत्रणात येईपर्यंत पुणे, नागपूर, लातूर आणि औरंगाबाद या चार जिल्ह्य़ांमधील आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून त्यांना शनिवारी आणि रविवारीही कामावर हजर राहावे लागणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली.  
स्वाईन फ्लूबद्दलच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांबाबत माहिती देण्यासाठी आरोग्य मंत्र्यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पुणे, नागपूर आणि मुंबई या विमानतळांवर उतरणाऱ्या व येथून सुटणाऱ्या विमानांमध्ये प्रवाशांना स्वाईन फ्लूबद्दल माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
आरोग्य मंत्री म्हणाले, ‘‘बस, रेल्वे स्थानकांबरोबरच विमानतळांनाही स्वाईन फ्लूबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विमानात संरक्षक पट्टा कसा बांधावा वगैरे माहिती देतानाच स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी काय काळजी घ्यावी याच्याही सूचना देण्यात येणार आहेत. स्वाईन फ्लूसाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ही स्थापन केली असून पोलिओ कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडे सर्वेक्षणाचे काम सोपवले आहे. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा पुण्यात झोपडपट्टी भागातील नागरिकांना फायदा होईल.’’
सध्या स्वाईन फ्लूसाठी जमावबंधीची गरज नसून लोकांनी स्वत:हून गर्दीत जाणे टाळावे आणि लक्षणे दिसल्यावर आजार अंगावर काढू नये, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘शनिवारी पाऊस पडल्यामुळे स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढेल अशी भीती नागरिकांमध्ये असून याबाबत राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेशी (एनआयव्ही) चर्चा केली आहे. दोन दिवस सातत्याने कमाल तापमान किमान तापमानाच्या दुप्पट झाले तर स्वाईन फ्लू ओसरेल असे त्यांचे मत आहे. रुग्णाला एक दिवस सर्दी, ताप, खोकला असल्यास रुग्णाच्या प्रकृतीनुसार आधी प्रतिजैविके देऊन पाहावीत, चोवीस तासांत फरक पडला नाही तरच ऑसेलटॅमीविर (टॅमी फ्लू) द्यावे. सरसकट ऑसेलटॅमीविरचा वापर करू नये, असे खासगी डॉक्टरांना सांगण्यात येत आहे.’’
———-

‘सरसकट सर्वाना आत्ता लशीची गरज नाही’

आरोग्य मंत्री म्हणाले, ‘‘स्वाईन फ्लू प्रतिबंधक लशीच्या बाबतीत तज्ज्ञांचे दोन मतप्रवाह असून काही तज्ज्ञांच्या मते लशीमुळे मिळणारी रोगप्रतिकारशक्ती ८ ते १२ महिने टिकत असल्याने ती साथीच्या सुरुवातीला घेणे योग्य आहे. मे व डिसेंबर महिन्यांत लस घ्यावी असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार लशीची उपयुक्तता ७० ते ८० टक्के आहे. लशीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केंद्र सरकार जाहीर करते. सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोग्य कर्मचारी आणि स्वाईन फ्लूचा अधिक धोका असलेले गट यांनीच लस घ्यावी, इतरांनी सध्या लस घेण्याची आवश्यकता नाही. एनआयव्ही व केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून आठवडय़ाभरात त्याबद्दलची भूमिका स्पष्ट होईल. केंद्र सरकारकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यासाठी लशीचे १५०० डोस राज्याला उपलब्ध होत आहेत.’’