बुद्धिमत्ता असूनही घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही, अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या पावणेतीनशे मुलींना शुक्रवारी शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली. कौटुंबिक अडचणीमुळे द्विपदवीधर होता आले नाही, हे वास्तव स्वीकारून नव्या ‘सावित्रीच्या लेकी’ घडविण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ‘लीला कुटुंबा’मध्ये २७५ मुलींची नव्याने भर पडली. या मुलींना शिष्यवृत्ती प्रदान होत असताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले.
लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे विज्ञान शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम, नर्सिग (परिचारिका), औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), फिजिओथेरपिस्ट या अभ्यासक्रमांसाठी निवड झालेल्या २७५ मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे यंदा २० वे वर्ष होते. ज्येष्ठ उद्योजिका लीला पूनावाला, कमिन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनंत तळाशीलकर, एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा आणि फिरोज पूनावाला या वेळी उपस्थित होते.
फाउंडेशन केवळ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेत नाही. तर, त्यांच्यामध्ये त्यांना स्वावलंबी होण्याचा आत्मविश्वास निर्माण करीत आहे. बहुतांश मुली या ग्रामीण भागातील आहेत. या मुलींना चांगल्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध व्हावेत हा कटाक्ष असतो. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण संपादन केलेल्या १४० मुली इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड येथे उत्तम कामगिरी बजावत आहेत, असे लीला पूनावाला यांनी सांगितले. लहान वयामध्ये लग्न करण्यापेक्षा मुलींना अभ्यास करू द्यावा. त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करून आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवा, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.
लीला पूनावाला यांच्यापासून प्रेरणा घेऊन माझी मुलगी ऋजुता हिने इंजिनिअर होण्याचे ठरविले आहे, असे सांगून शिशिर जोशीपुरा यांनी मुलींना शिक्षण घेऊ देण्याचा निर्णय घेणाऱ्या पालकांचे अभिनंदन केले. या फुलपाखरांना मजेमध्ये उडू द्यावे आणि आयुष्याचा आनंद घेता यावा यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘जहाँ गम भी ना हो आँसू भी ना हो बस प्यारही प्यार पले’ हे किशोरकुमार यांचे गीत अनंत तळाशीलकर यांनी सादर केले, तेव्हा मुलींनी टाळ्या वाजवून ताल धरला.