शिवाजीनगरच्या न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान “पुण्यात खंडपीठ झाले पाहिजे”, अशी घोषणाबाजी वकिलांनी केली. दरम्यान, पुण्यातील खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्तींशी चर्चा करू असे केवळ आश्वासनच मुख्यमंत्र्यांनी उपस्थित वकिलांना दिले.

पुण्यात शिवाजीनगर येथील न्यायालयात कुटुंब न्यायालयाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजूळा चेल्लूर यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात पुण्यातील खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्ती काहीतरी माहिती देतील अशी अपेक्षा येथिल वकिलांना होती. मात्र, तसे काहीच झाले नसल्याने नाराज झालेल्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजीला सुरुवात केली.

मुख्यमंत्री म्हणाले, एखाद्या दुकानाच्या उद्घाटनाला गेल्यावर दुकान आधिक चालू दे असे सांगावे लागते. मात्र, आज कुटुंब न्यायालयाचे उदघाटन करण्यास आलो असून या न्यायालयातून आधिकधिक केस निकाली लागल्या पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

पुणे शहरातील शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्‍या आहेत. ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ज्ञ, बाल मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष यांचा समावेश आहे.

न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरीकदृष्टया विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकिल व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमिगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. नूतन इमारतीमुळे वकील, पक्षकार आणि कर्मचारी यांची सोय होणार आहे.