महायुतीचे जागावाटप लवकरच होणार असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी १५ ऑगस्टपर्यंत जाहीर होईल, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. राज्याबाबत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, हाच निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मोदींवर टीका करण्यापेक्षा सुशासनासाठी मोदींकडून धडे घ्यावेत, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.
विधानसभा निवडणूक तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी येथे बोलावण्यात आली होती. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ही घोषणा केली. महायुतीमधील सर्व पक्षांना विचारात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप केले जाईल. लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे प. महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाले तसेच यश येत्या निवडणुकीतही मिळेल. निवडणूक तयारीच्या दृष्टीने भाजपची पहिली उमेदवार यादी १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उसने अवसान आणून टीका करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी चांगल्या प्रशासनासाठी मोदींकडून धडे घ्यावेत. म्हणजे काही निर्णय त्यांना घेता येतील, असेही ते म्हणाले. पुण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना मंजूर होऊन देखील प्रत्यक्षात कॅमेरे बसलेले नाहीत याबाबत राज्य शासनावर जोरदार टीका करत फडणवीस म्हणाले की, कंपन्यांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळेच पुण्यात कॅमेरे बसवले जात नाहीत.
पक्ष पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे-पालवे, संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
कोथरूड मतदारसंघ भाजपने लढवावा
येत्या निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपने लढवावा अशी जोरदार मागणी शनिवारी या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. युतीत पहिल्यापासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असला, तरी हा मतदारसंघ मूळचा भाजपचा असून लोकसभा निवडणुकीत शिरोळे यांना कोथरूडमधून ९१ हजार एवढे मताधिक्य मिळाले आहे. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेने कोथरूडमध्ये भाजपच्या विरोधात चार ठिकाणी उमेदवार उभे केले होते, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. प्रा. मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ, जगन्नाथ कुलकर्णी, मंदार घाटे, जयंत भावे, डॉ. संदीप बुटाला यांच्यासह मतदारसंघातील कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.