पुण्यातील उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपो बंद करण्यात यावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी ग्रामस्थांनी अर्धनग्न होत प्रशासनाचा निषेध केला. गेल्या १५ दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. यावेळी राज्य सरकार आणि महापालिका कचरा डेपोप्रश्नी निर्णय घेत नसल्याबद्दलही यावेळी आंदोलनकर्त्यांनी निषेध नोंदवला.

उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपो बंद व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या २० वर्षापासून लढा देत आहे. मात्र, अजूनही येथील कचरा डेपोचा प्रश्न मार्गी न लागल्याने यंदा ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून असून ग्रामस्थांनी कचऱ्याची एकही गाडी डेपोच्या परिसरात येऊन दिलेली नाही. यावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनीदेखील गावकऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, गावकरी येथील कचरा डेपो करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, या प्रश्नासंदर्भात महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता. मात्र, त्यावेळी पालकमंत्री, प्रशासन आणि ग्रामस्थांशी चर्चा करून प्रश्न सोडवा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर महापौर मुक्त टिळक़ यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने शहरामध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश महापौरांनी पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, पालिका प्रशासनाला यामध्ये अपयश आले होते. त्यामुळे शहराच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग पडून राहिले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजप या समस्येवर कशाप्रकारे तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.