शिक्षण विभागाकडून पहिलीतील प्रवेशासाठी आता कमाल वयाचीही मर्यादा

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठीच्या वयाच्या निकषाबाबत शिक्षण विभागाने पुन्हा एकदा नवा गोंधळ केला आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी आता वयाचा कमाल निकषही ठरवून दिला आहे. किमान आणि कमाल वयामध्ये दीड वर्षांचे अंतर राहणार आहे.

पंचवीस टक्क्य़ांच्या प्रवेशासाठी वारंवार येणाऱ्या शासन निर्णय आणि परिपत्रकांनी आता पालकांचा गोंधळ वाढवला आहे. या वर्षी शासनाने ३० सप्टेंबर २०१७ रोजी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे किमान वय हे ५ वर्ष चार महिने असणे गरजेचे असल्याचे जाहीर केले होते. आता त्यात नवी भर घालून मुलांसाठी कमाल वयही ठरवण्यात आले आहे. जर इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलाचे किमान वय हे ५ वर्ष ४ महिने असेल तर त्याचे कमाल वय हे ६ वर्ष ११ महिने २९ दिवस इतके असेल. याबाबत शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार पहिलीसाठी १ डिसेंबर २०१० नंतर जन्म झालेले विद्यार्थी पहिलीसाठी, ३० मार्च २०११ नंतर जन्म झालेले विद्यार्थी मोठय़ा गटासाठी, ३० मार्च २०१२ नंतर जन्म झालेले विद्यार्थी छोटय़ा गटासाठी आणि ३० मार्च २०१३ नंतर जन्म झालेले विद्यार्थी नर्सरीतील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत.

 

शालेय शिष्यवृत्ती परीक्षेला प्रतिसाद घटला

नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या निम्मी; राज्यभरात २६ फेब्रुवारीला परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील साडेनऊ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद घटला आहे. ही परीक्षा रविवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. आतापर्यंत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत होती. मात्र एक वर्षांचा खंड घेऊन या वर्षीपासून पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा होणार आहे. मात्र या वर्षी या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळपास निम्याने घट झाली आहे. या वर्षी पाचवीच्या एकूण ५ लाख ४५ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०१५ मध्ये चौथीतील ९ लाख २७ हजार ७८९ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या वर्षी आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यर्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे, तर २०१५ मध्ये सातवीतील ६ लाख ६७ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती.

या वर्षीपासून या परीक्षेसाठीही बहुसंच प्रश्नपत्रिकांची पद्धत अमलात आणण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) उत्तराच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. परंतु, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (आठवी) प्रत्येक प्रश्नपत्रिकेत कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक आहे. कोणत्या प्रश्नांची दोन उत्तरे द्यावीत याबाबत प्रश्नपत्रिकेत सूचना दिल्या जाणार आहेत.