पुणे विभागाची प्राथमिक फेरी आजपासून

विषयांचे वैविध्य, उत्तम सादरीकरण आणि नवं काहीतरी करून पाहण्याची ऊर्मी अशा जमेच्या बाजूंसह पुणे विभागातील महाविद्यालयांचे संघ ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्या फेरीसाठी सज्ज झाले आहेत. पुणे विभागाच्या फेरीची सुरुवात शनिवारी (३ डिसेंबर) होणार आहे.

पुढील फेरीतच नाही, तर ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीतही जिंकायचे या जिद्दीने पुणे विभागातील संघ आता तयार झाले आहेत. कुणाला आपली संहिता दमदार वाटत आहे, तर कुणाला कथा किंवा मूळ संकल्पना ही जमेची बाजू वाटत आहे. सादरीकरणाच्या जोरावर जिंकण्याचा विश्वास काही संघ व्यक्त करत आहेत.

‘दो बजनीये’ ही एकांकिका आम्ही सादर करीत आहोत. उत्तम संहिता ही आमच्या एकांकिकेची जमेची बाजू आहेच, पण त्याचबरोबर तसेच सर्वच कलाकारांनी कसून सरावही केला आहे.’

– सुरज जरग, राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, इस्लामपूर

‘लोकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहोत याचा खूप आनंद आहे. ‘उकल’ असे आमच्या एकांकिकेचे नाव आहे. आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीतून निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही निवडलेला विषय हा आमचे बलस्थान आहे.’

– अभिनय खौरमोड, इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे

‘लोकसत्ता लोकांकिका २०१४’ मध्ये आम्ही सहभागी झालो होतो. त्यामुळे या स्पर्धेचा अनुभव गाठीशी आहे. यंदाच्या वर्षी ‘थ्री हंडरेड मिसिंग’ ही एकांकिका आम्ही सादर करत आहोत. आमच्या कलाकारांचा सराव चांगला झाला असून तालिम फेरीत सादरीकरण उत्तम होईल याची खात्री आहे.’   

 – यश रुईकर, सर परशुरामभाऊ महाविद्यालय

‘आम्ही या आधी लोकांकिकामध्ये सहभाग घेतला असल्याने हे व्यासपीठ परिचयाचे आहे. यंदाच्या वर्षी ‘पडद्यामागे’ ही एकांकिका सादर करीत आहोत. सर्वाना आपलासा वाटणारा विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. सादरीकरण आणि एकूण परिणाम हा चांगलाच होणार असा विश्वास आहे.’

– मुक्ता बाम, फग्र्युसन महाविद्यालय