‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीचा दुसरा दिवसही विषयांतील वैविध्याने आणि विद्यार्थी लेखकांनी रविवारी गाजवला. प्राथमिक फेरीतून सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि स. प. महाविद्यालयाने विभागीय अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत आणि अस्तित्वच्या सहकार्याने होत असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची पुणे विभागाची प्राथमिक फेरी शनिवार (३ डिसेंबर) आणि रविवार (४ डिसेंबर) अशी दोन दिवस झाली. या फेरीचा दुसरा दिवसही विद्यार्थी लेखकांनी गाजवला. विषयांचे वैविध्य हे या फेरीचे वैशिष्टय़ ठरले. इसिसच्या हल्ल्यानंतर इराकमध्ये निर्माण झालेली परिस्थिती, कश्मीरमधील परिस्थिती, सामाजिक विषमता अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी भाष्य केले. भारत पाकिस्तान फाळणी ते चित्रपटातील स्पेशल इफेक्ट्सच्या निर्मात्याची गोष्ट.. अशी ऐतिहासिक सफरही विद्यार्थ्यांनी घडवली. एकांकिका स्पर्धेतील फसलेल्या प्रयोगाच्या गोष्टीने वातावरण हलके फुलके केले, तर प्रेमातील गंमत मूकनाटय़ाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्नही विद्यार्थ्यांनी केला.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोगळेकर आणि अभिनेत्री वर्षां घाटपांडे यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. या वेळी या स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सतर्फे प्रसिद्ध दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी आणि कौस्तुभ केंडे युवा रंगकर्मीची पारख करण्यासाठी उपस्थित होते. ‘झी युवा’, ‘क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे’, ‘केसरी’ हे या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. प्राथमिक फेरीतून चार एकांकिका पुणे विभागाच्या अंतिम फेरीत दाखल झाल्या असून बुधवारी (७ डिसेंबरला) ही फेरी होणार आहे. विभागीय अंतिम फेरी सर्वाना पाहण्यासाठी खुली आहे.

विभागीय अंतिम फेरीचा तपशील

  • कधी – ७ डिसेंबर (बुधवार), सायंकाळी ५
  • कुठे – भरतनाटय़ मंदिर, पेरूगेट

पुणे विभागीय अंतिम फेरीत निवड झालेली महाविद्यालये आणि एकांकिका

  • सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, वडगाव (पाहुणा)
  • अप्पासाहेब जेधे महाविद्यालय (घोरपडेच्या बैलाला..)
  • आबासाहेब गरवारे महाविद्यालय (नेकी)
  • स. प. महाविद्यालय (३०० मिसिंग)