‘लोकसत्ता लोकांकिका’ प्राथमिक फेरीतील परीक्षकांचे मत

वेगळे विषय मांडण्याची धडपड, त्यासाठी केला जाणारा विचार, विषयांवर केला जाणारा अभ्यास आणि नाटकाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची विद्यार्थ्यांची धडपड कौतुकास्पद असल्याचे मत ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक आणि आयरिस प्रॉडक्शनच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्याचवेळी सादरीकरणातील बारकाव्यांचा अधिक विचार होणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही सादरीकरणानंतर परीक्षकांशी चर्चा करून आपल्या त्रुटी जाणून घेतल्या.

पुणे विभागाच्या प्राथमिक फेरीत विषयांची विविधता पाहावयास मिळाली. काही एकांकिकेच्या विषयांमध्ये सारखेपणा आढळला. त्यातील अभिनयात व सादरीकरणातील बारकावे पाहून निवड करण्यात आली. निवड झालेल्या महाविद्याल्याच्या संघांनी प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य यांच्या माध्यमातून विभागीय अंतिम फेरीतील सादरीकरणात अधिक रंग भरावेत. प्रेक्षकांच्या दृष्टीने नाटक अधिकाधिक चांगले कसे करता येईल याचा विचार करावा. एकूण स्पर्धेचा आढावा घेता काही महाविद्यालयांच्या सादरीकरणामध्ये समरसता कमी पडली. काही संघांचे विषय चांगले असले तरी कलाकार त्या विषयाला न्याय देण्यात थोडे कमी पडले. सादरीकरणातील बारकाव्यांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.’’

– दिलीप जोगळेकर, परीक्षक

‘‘सादर झालेल्या एकांकिकेमध्ये खूप वैविध्यपूर्णता होती. विद्यार्थ्यांनी सादरीकरण उत्तम केले. वेगळे विषय निवडण्याचा, त्या निमित्ताने त्याचा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. भूतकाळातील विषय हाताळताना तो काळ रंगमंचावर उभा करण्याचा प्रयत्न चांगला होता. या प्रकारातील एकांकिका मोठय़ा मंचावर सादर होतील तेव्हा त्याचा परिणाम जाणवेल. काही कलाकारांचा प्रयत्न चांगला असला तरी त्यांना एकांकिकेतील बारकावे समजण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचे जाणावले. विषय व अभिनय उत्तम होता, पण अभिनेते भूमिकेचे ‘बेअरिंग’ सांभाळण्यास कलाकार कमी पडत होते. पुण्याच्या बाहेरील भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील खूप चांगल्या प्रकारे सादरीकरण केले.’’

– वर्षां घाटपांडे, परीक्षक

लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेदरम्यान कलाकारांमध्ये आत्मविश्वास व उत्साह पाहावयास मिळाला. सादर करण्यात आलेल्या एकांकिकेमधून स्पर्धकांचे सामाजिक भान दिसले. तरुणाई फक्त समाजमाध्यमातून सामाजिक विषयावर व्यक्त होताना पाहावयास मिळते, परंतु एकांकिकेच्या माध्यमातून सामाजिक विषयावर भाष्य करता येते हे या स्पर्धेमधून पाहावयास मिळाले. कलाकारांनी सादरीकरणातील बारकाव्यावर अधिक काम करायला हवे असे जाणवले.’’

– कौस्तुभ केंडे,आयरिस प्रॉडक्शन

‘‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये विद्यार्थ्यांकडून सादर होणाऱ्या विषयात वेगळेपणा जाणवला. एकांकिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्घतीने मांडणी करून समाजातील घडामोडींवर भाष्य करण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अनुभवी कलाकारांनी चांगल्या पद्घतीने एकांकिका सादर केल्या, तर काही कलाकार पहिल्यांदाच एकांकिका सादर करत होते, त्यांचाही प्रयत्न चांगला होता. त्या गुणी कलाकारांना अधिक ‘पॉलिश’ करण्याची गरज असल्याचे जाणवले.’’
– प्रतिमा कुलकर्णी, आयरिस प्रॉडक्शन