लोणावळय़ात पर्यटनासाठी येणाऱ्यांची बेशिस्त आणि तरुणाईच्या उन्मादामुळे दरवर्षी सरासरी १० ते १५ जणांना जीव गमवावा लागतो. तरुणाईचा बेफामपणा, अतिउत्साह व निष्काळजीपणा यामुळे वर्षांनुवर्षे पर्यटकांच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. लोणावळ्यात खऱ्या अर्थाने पाऊस सुरू होऊन जेमतेम १० दिवस झाले असतानाच आतापर्यंत ३ तरुणांना पाण्यात बुडून किंवा दरीत पडून जीव गमवावा लागला असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
लोणावळा हे खूप जुन्या काळापासून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. पावसाळा सुरू झाला की, या ठिकाणी धबधबे कोसळू लागतात, तळी भरतात, ओढे-नाल्यांसारखे नैसर्गिक प्रवाह वाहू लागतात. हिरवाई जास्तच आकर्षक बनते आणि पर्यटकांची गर्दी सुरू होते. येथे असलेले अनेक पॉईंट्स हे विशेष आकर्षण. मुसळधार पाऊस आणि धुक्याचा खेळ पाहायचा असेल तर लोणावळा एक खास ठिकाण ठरते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांच्या धिंगाण्यामुळे आणि वाहतुकीच्या बेशिस्तीमुळे हे ठिकाण शांत, सुसंस्कृत पर्यटकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. येथे मृत्यू होतात त्यापैकी अनेकजण दारू पिऊन बेधुंद झालेले असतात. त्यात अतिउत्साह आणि जास्तीचे धाडस दाखवून मरण पावलेल्याची संख्या अधिक असते.
या वर्षी पहिली दुर्घटना घडली ती लायन्स पॉइंट येथील गिधाड तलावात. येथे एक जण बुडाला. दुसऱ्या घटनेत मागील शुक्रवारी पुणे येथील युवक खंडाळा येथील काचळदरीत ७०० फूट खोल पडून मृत्युमुखी पडला. तब्बल दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह मिळाला. गेल्याच मंगळवारी (२२ जुलै) चिंचवड येथून मित्रांसह फिरावयास आलेला विशाल दत्तात्रय उदगीरकर हा तरुण भुशी डॅममध्ये पडून मृत्युमुखी पडला. अतिउत्साह, मद्यपानाचा अतिरेक, तरुणींवर इम्प्रेशन मारण्यासाठी चढाओढ  बहुसंख्य याच गोष्टी या अपघातांना कारणीभूत असल्याचे दिसून येते. यामुळे सुसंस्कृत पर्यटक या ठिकाणांपासून हळूहळू दूर झाला आहे.

बेदरकारपणाचे बळी
घटना १:
गेल्याच आठवडय़ात पुण्यातील एक युवक खंडाळा येथे ७०० फूट खोल काचळदरीत पडून मरण पावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण दोन-तीन बाटल्या बियर प्यायला होता. तो दरीच्या तोंडावरील एका झाडाला टेकून फोटोसाठी पोझ देत होता. त्याने मित्रांना फोटो काढायला सांगितले. मात्र, तो घसरून खोल दरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
.
घटना २ :
गेल्याच मंगळवारचा प्रसंग. चिंचवड येथील विशाल दत्तात्रय उदगीरकर (वय २९) हा तरुण भुशी डॅममध्ये बुडून मरण पावला. तो बांधावरून पाय घसरून पडला होता. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि त्याचे चार मित्र मंगळवारी चिंचवड येथून लोणावळ्याला आले होते. ते सायंकाळी भुशी डॅम येथे गेले. त्याठिकाणी पायऱ्यांवरून कोसळणाऱ्या पाण्यात भिजत होते. यावेळी विशाल हा बांधावर गेला. तेथे थट्टामस्करी सुरू असताना त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याच्या मित्रांनी आरडा ओरडा केल्यावर साहेबराव चव्हाण याने पाण्यात उडी मारून त्याला काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो खोल पाण्यात बुडाल्याने अखेर त्याचा बुडून मृत्यू झाला.
.
आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू
लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या आठ पर्यटकांचा गेल्या दोन आठवडय़ांत मृत्यू झाला आहे. लोणावळ्याहून मंगळवारी पर्यटनाचा आनंद लुटून घरी जाणाऱ्या चिखली व चिंचवड येथील तीन मित्रांचा जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय मार्गवर अपघाती मृत्यू झाला.

प्रतिक्रिया :

‘मद्यधुंद तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त’
शनिवार, रविवार लोणावळय़ात येणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होते. पर्यटक कोठेही गाडय़ा उभ्या करतात. मद्याने बेधुंद झालेले तरुण-तरुणी मोठय़ा संख्येने असतात. ते डोंगरकपाऱ्यांमध्ये कोठेही कसेही चढतात, त्यामुळे हे अपघात होतात. लोणावळा पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्रात सूचना फलक लावले आहेत. काही ठिकाणी वाहनतळांची सोय, पोलीस कर्मचाऱ्यांकडून आवाहन, अतिरिक्त बंदोबस्त अशा उपाययोजना केल्या आहेत. पर्यटकांनी लोणावळय़ात येऊन निसर्गाचा आस्वाद घ्यावा. जिवावर बेतेल असे प्रकार करू नये.

– आय. एस. पाटील (पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे)
.

‘मरण पावणारे बहुतांश पर्यटक २०-३० वर्षे वयोगटातील’
कडय़ांवरून पडणारी किंवा पाण्यात बुडणारी मुले २० ते ३० या वयोगटांतीलच असतात. त्यात मुली नसतात. मुलींवर इम्प्रेशन मारण्याच्या प्रयत्नातून बऱ्याचदा असे अपघात होतात. अशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आमची संस्था विनामूल्य मदत करते.
– सुनील गायकवाड (सचिव, शिवदुर्ग संस्था)
.
महाबळेश्वर व माथेरान येथे जाणारे पर्यटक हे कुटुंबवत्सल असतात. लोणावळय़ात किशोरवयीन मुले आणि ३०/३५ वर्षांच्या तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त असते. त्यांचे कपडे व अंगविक्षेपाने शहराचे सांस्कृतिक वातावरण बिघडते. लोणावळय़ातील पर्यटन टिकविण्यासाठी उपाय केले जाणार आहेत. मार्गदर्शक फलक, वाहनतळांची उपलब्धता, रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– अमित गवळी (नगराध्यक्ष, लोणावळा नगरपालिका)