अगदी ऐंशीच्या दशकापर्यंत हरवलेल्या व्यक्तींची माहिती देणारा साधारण पाच मिनिटांचा ‘आपण यांना पाहिलंत का?’ कार्यक्रम रोज चालत असे. पुढच्या कार्यक्रमाची वाट पाहात असताना समोर येणारी छायाचित्रे आणि संबंधित व्यक्तीची माहिती देखील उत्सुकतेने पाहण्याचे ते दिवस होते. त्या वेळी ‘आपण यांना पाहिलंत का?’ असे लिहून खाली हरवलेल्या पाळीव कुत्र्या, मांजराचे फोटो लावण्याचा खोडसाळपणा हा विनोदाचा विषय ठरत होता. मात्र ‘कुत्र कधीतरी पळून जायचंच किंवा मांजर घरोघरी फिरायचंच’ हे समज पशू पालकांमध्ये बेजबाबदारपणाचे ठरू लागले. हरवलेल्या प्राण्यांची आणि त्यांच्या पालकांची पुनर्भेट घडवून आणणारी ‘पेट लॉस्ट अँड फाऊंड सव्‍‌र्हिस’ किंवा ‘मिसिंग पेट फाइंडर्स संकेतस्थळे, सेवा पशुपालकांसाठी दिलासा ठरल्या आहेत.

फिरायला सोडलेले कुत्रे किंवा मांजर परत आलेच नाही, पिंजऱ्याचे दार नीट लागले नाही आणि पक्षी उडून गेले अशा परिस्थितीत शेजारी, आसपास विचारणे आणि वाट पाहणे या पलीकडे ही शोधमोहीम जात नाही. असहायतेचा अनुभव देणाऱ्या या दिशाहीन शोधमोहिमेला थोडे शिस्तबद्ध स्वरूप हरवलेल्या कुत्र्यांचा शोध घेणाऱ्या सेवांनी दिले. श्वान किंवा पक्षी विकत घेण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च आणि त्याहीपेक्षा मोठा जिव्हाळा यांमुळे कधीतरी हरवलेल्या प्राण्याचा शोध घेणारी यंत्रणा ही आता पशुपालकांची गरजही बनली आहे. एकमेकाला मदत करण्याच्या हेतूने समाज माध्यमे, संकेतस्थळे या माध्यमातून पाळीव प्राण्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे. हरवलेल्या श्वानाचे किंवा मांजराचे छायाचित्र अपलोड करायचे, प्राणी कुठून हरवला, कोणत्या परिस्थितीत हरवला त्याची माहिती, प्राण्याची काही वैशिष्टय़ं असतील तर ती, त्याच्या सवयी असे तपशील ‘पशुपालकां’नी द्यायचे. त्याचप्रमाणे, मिळालेल्या प्राण्यांचे तपशील प्राणिप्रेमी, स्वयंसेवी संस्थांकडून या संकेतस्थळावर दिले जातात. या दोन्ही तपशिलांची पडताळणी करून हरवलेला प्राणी शोधण्याचा प्रयत्न करायचा अशा स्वरूपांत या संकेतस्थळांचे काम चालते. समाज माध्यमे हा हरवलेल्या प्राण्यांच्या शोधमोहिमेतील मोठा घटक आहे. वेगवेगळ्या संस्था, प्राणिप्रेमींकडून सुरू करण्यात आलेली फेसबुक पेजेस आणि ट्विटर हँडल्सचा हरवलेल्या प्राण्यांचा शोध घेण्यात मोठा वाटा आहे. अगदी प्रत्येक शहरातील प्राणिप्रेमी आपापले गट करून ही शोधमोहीम चालवत आहेत.

जीपीएस कॉलर्स

भारतात अजूनही हरवलेल्या पाळीव प्राण्यांचा शोध घेणाऱ्या या सेवेने व्यावसायिक स्वरूप स्वीकारलेले नाही. मात्र, प्राणी हरवूच नये म्हणून जीपीएस प्रणाली असलेले पट्टे (कॉलर्स) हा चांगला पर्याय ठरला आहे. ऑनलाईन बाजारात तर आहेतच, पण प्राण्यांची उत्पादने विकणाऱ्या दुकानांमध्येही हे पट्टे आता सहज मिळू लागले आहेत. दिसायला साधारण नेहमीच्या गळ्यातील पट्टय़ासारखे दिसणारे या कॉलर्समध्ये जीपीएस डीव्हाईस बसवलेली असते. त्या माध्यमातून हा पट्टा गळ्यात असलेला श्वान जेथे जाईल त्याचे ठिकाण गुगल मॅपवर दिसू शकते. श्वानाला फिरायला सोडले किंवा ते पळून गेले, कुणी पळवून नेले तर या पट्टय़ातील जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून श्वानाचा ठावठिकाणा कळू शकतो. श्वानाला एकटय़ालाच फिरायला सोडल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणेही या पट्टय़ांच्या माध्यमातून शक्य आहे. साधारण दीड ते दोन हजार रुपयांपासून अगदी १५ हजार रुपयांपर्यंत या पट्टय़ांची किंमत आहे. काही पट्टय़ांना ब्लूटूथच्या माध्यमातून फोनला जोडणे शक्य आहे. पट्टय़ाला असणाऱ्या छोटय़ा स्पिकरच्या माध्यमातून श्वानाला तुमची हाकही ऐकू येऊ शकते. त्यामुळे फिरण्याची वेळ संपल्यानंतर त्याला बोलावणेही शक्य आहे.

हरवलेल्या प्राण्यांच्या शोधासाठी

ilostmudog.in

flealess.org