मंदिरे, मशिदी, चर्च अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी किंवा उत्सवांमध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात यावी, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून या याचिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येत आहे.
कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा उत्सव असेल, तर त्यासाठी ध्वनिक्षेपकाचा सर्रास वापर होतो. मात्र, त्यामुळे अनेक वेळा सामाजिक तेढ निर्माण होत असल्याचीही उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे ध्वनिप्रदूषण आणि देशातील शांतताप्रिय नागरिकांना होणारा त्रास असे मुद्द आहेतच. या पाश्र्वभूमीवर विनीत नरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अनेक निर्णय दिले आहेत. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांना बंदी करण्याबाबतच्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने आणखी काही तपशील मागितले आहेत. या याचिकेला नागरिकांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात येत आहे. याचिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन याचिकाकर्त्यांनी केले आहे. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत २३१ नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शवला आहे.  www.change.org या संकेतस्थळावर ही याचिका उपलब्ध असून त्यावरही नागरिक आपला पाठिंबा दर्शवू शकतात.