मोटारसायकल चालवण्याची किंवा प्रवासाची आवड म्हणून अनेक जण खूप दिवसांचा प्रवास मोटारसायकल चालवत करतात, पण केवळ विविध राज्यांमधील कला पाहण्यासाठी कुणी ‘बुलेट’वरून देशाला प्रदक्षिणा घातली तर?.. पुण्यातील ज्येष्ठ कलाकार प्रशांत पाडवे यांनी आपल्या कलाप्रेमासाठी तब्बल ४६ हजार किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने मोटारसायकलवर केला आहे.
वाकडमध्ये राहणारे पाडवे हे टेराकोटा कलाकार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी शनिवारवाडय़ापासून देशप्रवासाला सुरुवात केली आणि १७ एप्रिलला ते पुण्यात परतले. ६ महिने १० दिवसांच्या या प्रवासात पाडवे यांनी २७ राज्यांमधून प्रवास केला आणि तिथल्या स्थानिक कारागिरांची कला पाहिली. दररोज ३५० ते ४०० किलोमीटर ते प्रवास करत होते. रविवारी पुण्यात येताना ‘एन्फिल्ड रायडर्स असोसिएशन’ने त्यांचे नाशिक फाटय़ाजवळ स्वागत केले, तर त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी शनिवारवाडय़ावर महापौर प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव केला. पाडवे यांच्या पत्नी स्नेहा या वेळी उपस्थित होत्या.
‘मी आधीही मोटारसायकल चालवायचो, परंतु एवढा मोठा प्रवास पहिल्यांदाच केला. प्रवासापूर्वी नकाशांचा अभ्यास करून कुठे जायचे ती ठिकाणे निश्चित केली आणि मगच सुरुवात केली,’ असे पाडवे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आपल्याकडे प्रत्येक राज्यात वैशिष्टय़पूर्ण कला आढळते. कापड, संगमरवर, दगड, लाकूड, बांबू, ज्यूट, नारळ अशा विविध गोष्टींपासून कलाकृती बनतात. मी ग्रामीण भागातील अनेक कारागिरांना भेटलो. त्यांना व्यासपीठाची गरज आहे हे जाणवले. मी स्वत: कलाकार असल्यामुळे कलाकृतींच्या विक्रीबाबतच्या अडचणी मला माहिती आहेत. हस्तकारागिरांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा आहे.’