राज्याच्या बारावीच्या घसघशीत निकालामुळे आता प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. या वर्षी प्रथम श्रेणी आणि विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अभियांत्रिकी शाखा आणि पारंपरिक अभ्यासक्रमाच्या नावाजलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्पर्धा शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के लागला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक निकाल आहे.
राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गेल्या वर्षीचा विक्रम मोडीत काढत या वर्षी निकाल वाढला आहे. या वर्षी राज्यातील ९१.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर गेल्या वर्षी ही टक्केवारी ९०.०३ अशी होती. वाढलेल्या एकूण निकालाबरोबरच विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता पहिल्या वर्षांच्या प्रवेशासाठीची स्पर्धा वाढणार आहे. या वर्षी ९७ हजार ४२९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी म्हणजे ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत mu05साधारण १८ हजारांनी वाढ झाली आहे. प्रथम श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ४ लाख ५३ हजार २४ विद्यार्थी असून गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या जवळपास ५३ हजारांनी वाढली आहे. या वर्षी द्वितीय आणि तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहे.
 गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल साधारण दोन टक्क्य़ांनी वाढला आहे. विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र यांबरोबरच परीक्षा कठीण असल्याची ओरड झालेल्या रसायनशास्त्र विषयाचा निकालही साधारण २ ते अडीच टक्क्य़ांनी वाढला आहे. बहुतेक नावाजलेल्या महाविद्यालयांचे निकाल चांगले लागल्यामुळे बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या किंवा महाविद्यालय बदलण्याची इच्छा असलेल्या   विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा अधिकच असणार आहे. कला शाखेची परिस्थिती मात्र जैसे थे राहणार आहे.mu02
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सामायिक परीक्षेचे गुण आणि बारावीचे गुण असे दोन्ही गृहीत धरण्यात येणार आहेत. विशेष श्रेणीतील म्हणजे ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २० हजारांनी वाढल्यामुळे या वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे. मात्र, बारावीला चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे आता प्रवेशासाठी जेईईचा निकालच निर्णायक ठरेल. गेल्या वर्षी बारावीला साधारण ७० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी हा अभियांत्रिकी प्रवेशाच्या सूत्रानुसार ९० पर्सेटाईलच्या जवळापास होता. या वर्षी ७५ ते ८० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी हे ९० पर्सेटाईलपर्यंत पोहोचू शकतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे सर्वप्रथम मन:पूर्वक अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक कारकिर्दीच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची असते. त्यामुळेच तिचे घराघरांतून जरा अधिक कोडकौतुक केले जाते. यापूर्वी शिक्षण मंडळातर्फे या परीक्षेत अव्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्तायादीही प्रसिद्ध केली जात असे. मात्र त्यातून आपण शैक्षणिक क्षेत्रातील mu03घातक शर्यतीला प्रोत्साहन देत असल्याचे शिक्षणतज्ज्ञ आणि शैक्षणिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यानंतर अशी यादी प्रसिद्ध करण्याची पद्धत बंद करण्यात आली. ‘लोकसत्ता’चीही भूमिका तीच आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक भरपूर गुण प्राप्त करावेत. त्यांचे सर्वानी कौतुकही करावे. परंतु त्याला सार्वजनिक आणि माध्यमांना टीआरपी कमावण्याचा आणखी एक मार्ग असे स्वरूप येता कामा नये, असे लोकसत्तास वाटते. त्यामुळेच ‘लोकसत्ता’ने शिक्षण मंडळाच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय वा तृतीय क्रमांक संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या सुयशाचे ‘लोकसत्ता’स कौतुक नाही असा याचा अर्थ नसून, त्यांची यादी प्रसिद्ध करून जीवघेण्या शैक्षणिक शर्यतीला प्रोत्साहन मिळता कामा नये असा त्यामागील हेतू आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्ग यांच्याकडून ‘लोकसत्ता’च्या या भूमिकेचे स्वागतच होईल, अशी अपेक्षा आहे.

गुणांच्या खिरापतीचे अजून एक वर्ष, विद्यार्थ्यांना २० गुणांचा फायदा
अंतर्गत मूल्यमापनासाठी असलेल्या २० गुणांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होतो आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे निकालाचा फुगवटा दिसतो आहे. त्या पाश्र्वभूमीवर उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेतही किमान ३५ टक्के गुण मिळणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावर्षीपासून हा निर्णय नववी आणि अकरावीला लागू होणार आहे. त्यामुळे येत्या वर्षीही दहावी आणि बारावीचा निकाल विक्रमीच लागण्याची शक्यता आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालात लक्षणीय वाढ
दरवर्षी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल हा साधारण २५ ते ३० टक्क्य़ांपर्यंत लागतो. यावर्षी मात्र पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल ४६.६४ टक्क्य़ांपर्यंत पोहोचला आहे. मुळात गेल्या वर्षी वाढलेल्या निकालामुळे या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी गेल्या वर्षीपेक्षा कमी होते.
यावर्षी ९९ हजार २१९ पुनर्परीक्षार्थी होते. त्यातील ४६ हजार २७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गैरप्रकारांमध्ये घट
यावर्षीच्या बारावीच्या परीक्षा गाजल्या त्या समोर आलेल्या मासकॉपीच्या प्रकारांमुळे. मात्र, असे असले तरी गेल्या वर्षीपेक्षा परीक्षेच्या काळात होणाऱ्या गैरप्रकारांचे प्रमाण कमी झाले असल्याचे राज्य मंडळाचे म्हणणे आहे. यावर्षी परीक्षेदरम्यान ५२६ गैरप्रकारांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी ७३५ गैरप्रकारांची नोंद करण्यात आली होती.

निकालाची वैशिष्टय़े
*निकालात सव्वा टक्क्य़ांनी वाढ
*आतापर्यंतचा सर्वोच्च निकाल
*विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले
*सलग चौथ्या वर्षी कोकण विभाग अव्वल
*मुली आघाडीवर असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२९ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८८.८० टक्के आहे.
*अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९१.३५ टक्के
*रात्र महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ६५.०२ टक्के
*राज्यातील ९४६ महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल
*शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये ११
*एकूण १६१ विषयांपैकी १४ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून त्यात पर्यायी भाषा आणि कला विषय आहेत.

निकालाची टक्केवारी – ९१.२६
परीक्षेला बसलेले विद्यार्थी – १२ लाख ३७
हजार २४१
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – ११ लाख २९ हजार  ०७३

शाखानिहाय  टक्केवारी
विज्ञान – ९५.७२, वाणिज्य – ९१.६०, कला –
८६.३१,    
व्यवसाय अभ्यासक्रम – ८९.२०
*गुणपत्रकांचे वाटप – ४ जून दुपारी ३ वाजता
*गुणपडताळणीचा अर्ज करण्यासाठी मुदत – ४ ते १५ जून
*छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत –
१५ जून