महिलांवर अत्याचार आणि महिलांविषयीचे गुन्हे केवळ उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मोठय़ा प्रमाणात होत आहे, असे नसून महाराष्ट्रही त्यात आघाडीवर आहे, असे सांगत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सुषमा साहू यांनी आकुर्डीत केले. बराच काळ रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची नियुक्ती हिवाळी अधिवेशनानंतर होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
शहर भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ‘महिलांचे हक्क, कर्तव्ये आणि आव्हाने’ या विषयावर साहू यांनी मार्गदर्शन केले. अॅड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे, माउली थोरात, शैला मोळक, अपर्णा मणेरीकर, वेणू साबळे यांनी मनोगते व्यक्त केली. साहू म्हणाल्या, महाराष्ट्रातून राष्ट्रीय आयोगाकडे तक्रारी येण्याचे प्रमाण जास्त आहे. १५ तक्रारींपैकी एक महाराष्ट्रातून असते. राज्य आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती होत नसल्याने थेट दिल्लीपर्यंत तक्रारी येतात, ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा अधिवेशनानंतर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. महिलांपुढे अनेक समस्या आहेत. मात्र, महिलाच महिलांच्या शत्रू आहेत. एका महिलेने दुसऱ्या महिलेला पाठबळ दिल्यास बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतील. महिलांशी संबंधित गुन्हे वाढू लागले आहेत, त्यात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलीस गुन्हे दाखल करताना टाळाटाळ करतात, त्यासाठी महिला जागरूक हव्यात. महिलांसाठी केलेल्या कायद्यांचा २० टक्के गैरवापरही होतो.
स्वत:च्या घरातील महिलांबाबत आपण जसा विचार करतो, त्याच पद्धतीने, दुसऱ्यांच्या कुटुंबातील महिलांविषयी करावा. आपल्या हक्कांविषयी महिलांना जाणीव असते. मात्र, कर्तव्याचा विसर पडतो. प्रास्तविक शैला मोळक यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली धानोकार, आभार छाया पाटील यांनी मानले.

शहराध्यक्ष म्हणतात..महिलांकडून पुरुषांवर अन्याय
भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत बोलताना शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी, महिला देखील पुरुषांवर अन्याय करतात, अशी टिपणी केली. महिलांनी पुरुषांच्या पाठिशी उभे राहवे. पुरुषांनी महिलांवर व महिलांनी पुरुषांवर अन्याय करू नये. महिलाच महिलांच्या शत्रू असतात. महिलांनी कायद्याचा अभ्यास करावा, कणखर नेतृत्वासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
..हा तर ढोंगीपणा
शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर महिला गेली म्हणून तेथे दुग्धाभिषेक घालण्यात आला, हा ढोंगीपणा आहे. मात्र, मंदिराचे नियम व काही मर्यादा आपण पाळायलाही हव्यात.
– सुषमा साहू